नागपुरात रेशन धान्याच्या वितरणाबाबत ७०० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:45 AM2020-04-25T00:45:42+5:302020-04-25T00:46:51+5:30
लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. उद्या शनिवारपासून ते स्वत: रेशन दुकानांची पाहणी करणार आहे.
लॉकडाऊनमुळे गरीब व गरजूंना अन्नधान्याची कुठलीही कमतरता पडू नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने रेशन दुकानातून धान्य वितरणासंदर्भात काही उपाययोजना केल्या आहेत. परंतु मागील काही दिवसापासून रेशनमधील धान्याच्या वितरणाबद्दल बरीच ओरड सुरू आहे. कुठे धान्य कमी दिले जात आहे. तर कुठे गरिबांना किराणा किट मिळालेली नाही. पंतप्रधान योजनेचे धान्य मिळाले नाही अशा एक ना अनेक तक्रारी आहेत. थेट जिल्हाधिकाऱ्यांना अशा ७०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी झोननिहाय तपासणी करण्यासाठी झोनल अधिकारी तैनात केले आहे. हे अधिकारी उद्यापासून दोन दिवस प्रत्येक तक्रारीची शहानिशा स्वत: करणार आहेत. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी ठाकरे हे स्वत: काही रेशन दुकानांना भेटी देऊन पाहणी करतील. या तक्रारीनुसार कुणी रेशन दुकानदार कोट्यापेक्षा कमी धान्य दिल्याचे आढळून आले किंवा इतर तक्रारीनुसार दोषी आढळून आल्यास त्यांच्ंयावर कारवाई करण्यात येईल.