२७ गावांच्या विकासासाठी ७०० कोटींचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:18+5:302021-09-22T04:09:18+5:30
एनएमआरडीएची नवीन नागपूरची संकल्पना : नवी मुंबईच्या धर्तीवर शहरालगतच्या गावांचा विकास गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
एनएमआरडीएची नवीन नागपूरची संकल्पना : नवी मुंबईच्या धर्तीवर शहरालगतच्या गावांचा विकास
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) नवी मुंबईच्या धर्तीवर शहरालगतच्या २७ गावांचा विकास करून नवीन नागपूर निर्माण करणार आहे. या गावांना पाणीपुरवठा, सिवरेज अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करणार आहे. या प्रकल्पावर ६०० ते ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मेट्रोरिजन क्षेत्रातील ७१९ गावांचा विकास करण्यासाठी एनएमआरडीएची २०१५ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर प्रथमच शहरालगतच्या २७ गावांचा विकास आराखडा तयार केला आहे. यात मूलभूत सुविधांचा समावेश आहे. या गावांतील पाण्याची समस्या लवकरच मार्गी लागेल. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी चर्चा झाली आहे. सिवरेज प्रकल्पामुळे नियोजनबद्ध विकासाला गती मिळेल असा विश्वास नासुप्रचे सभापती तथा महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
नवीन ले-आऊटमध्ये विकासकांना रस्ते व वीज सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. त्यात पाणी व सिवरेज प्रकल्पामुळे विकासाला अधिक गती मिळणार आहे. नवीन नागपुरात नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा मानस सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
...
समावेश असलेली २७ गावे
पूर्व (ए) झोन - पांढुर्णा, तरोडी खुर्द, तरोडी ( बु.),बिडगाव, कापसी(खुर्द), कापसी ३५, पोवारी, अड्याळी, विहीरगाव, गोधनी, गोधनी (खुर्द),बहादुरा, खरबी,बाहादुरा
दक्षिण(बी)-रुई, वडोदा, पांजरी(फार्मस), किरणापूर, कन्हालगाव, वेळा हरिश्चंद्र,घोटपांजरी, शंकरपूर,हुडकेश्वर खुर्द, गोधनी, बेलतरोडी, पिपळा व बेसा आदी गावांचा समावेश आहे.
...
जामठा येथे अग्निशमन केंद्र
बांधकामासाठी अग्निशमन विभागाची मंजुरी आवश्यक आहे. यासाठी पूर्व विदर्भ व मेट्रो रिजनमधील विकासकांना मुंबईला जावे लागते. यात त्यांचा वेळ जातो, खर्चही वाढतो. याचा विचार करता एनएमआरडीए जामठा येथे अग्निशमन केंद्र उभारणार आहे. प्रतिनियुक्तीवर अग्निशमन अधिकारी नियुक्त केले जातील. यामुळे मेट्रो रिजनमधील विकासकांना अग्निशमन विभागाची मंजुरी मिळणे सोपे जाईल. सोबतच यातून एनएमआरडीएला महसूलही प्राप्त होईल, अशी माहिती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
...
खासगी सहभागातून वृद्धाश्रम
श्रीमंत कुटुंबांतील मुले विदेशात,अन्य शहरात व्यवसाय वा नोकरीसाठी गेल्यानंतर कुटुंबातील वृद्ध आई-वडील यांची देखभाल होत नाही. तसेच कौटुंबिक वा अन्य कारणांमुळे वृद्धांची देखभाल होत नाही. याचा विचार करता एनएमआरडीए लवकरच जामठा येथे वृद्धाश्रम उभारणार आहे. खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यावर ७ ते ८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
...