Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव
By नरेश रहिले | Published: July 18, 2024 07:54 PM2024-07-18T19:54:00+5:302024-07-18T19:54:36+5:30
Nagpur News: रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.
- नरेश डोंगरे
नागपूर - रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत बजावण्यात आलेल्या या कामगिरीमुळे या मुलांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले आहे.
घरगुती भांडणं, पालकांचे रागावणे, अन्य मुला-मुलींचे चमकदमक युक्त जीवण, बाह्य जिवनातील ग्लॅमरस तसेच अल्पवयीन गटातील आकर्षण वजा प्रेमप्रकरण आदी कारणांवरून अल्पवयीन मुला-मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाण सारखे वाढत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने २०१८ मध्ये -अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यासंबंधी एक योजना सुरू केली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते असे या मोहिमेला नाव देण्यात आले. त्यानुसार, आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा बालकल्याण समितीच्या मदतीने 'चाईल्ड हेल्पलाईन' सुरू करण्यात आली. त्यानंतर २०१८ ला पहिल्याच वर्षांत १७११२ अल्पवयीन मुला-मुलींना विविध रेल्वे स्थानकांवर आरपीएफने ताब्यात घेतले. दुसऱ्या वर्षी अर्थात २०१९ ला १५, ९३२ मुले-मुली, २०२० ला ५,०११ मुले-मुली, २०२१ ला ११, ९०७ , २०२२-२३ ला ११,७९४ आणि २०२४ ला ४,६०७ मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आरपीएफला यश आले.
मानसिकतेचा अंदाज अन् समुपदेशन
मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येते. त्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचेही समुपदेशन करून या मुला-मुलींना पालकांना सोपविले जाते.