कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:04 AM2020-08-28T01:04:04+5:302020-08-28T01:05:35+5:30
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत.
प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस आदींची व हॉटस्पॉटमधील नागरिकांची रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्ट करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह नागपुरातील सिटिझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून वरील माहिती दिली. राज्य सरकारने आपत्ती निवारण निधीतून नागपूर जिल्ह्याला २१ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.
३६७ कोरोना योद्धे पॉझिटिव्ह
२५ ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ३६७ सरकारी कोरोना योद्धे पॉझिटिव्ह आले होते. त्यात पोलीस विभागातील ११७, महानगरपालिकेतील ९, विभागीय आयुक्त कार्यालयातील १, जिल्हाधिकारी कार्यालयातील १५, पोलीस अधीक्षक कार्यालयातील ७ तर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील ९ कोरोना योद्ध्यांचा समावेश होता असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.