मनपात पीएफचा ७१ कोटींचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:52+5:302021-06-09T04:08:52+5:30
२०१७ पासून कर्मचाऱ्यांना पावत्या नाहीत : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात ...
२०१७ पासून कर्मचाऱ्यांना पावत्या नाहीत : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ३५ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे ३६ कोटी, असे ७१ कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाहीत. मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना याच्या पावत्याही मिळत नाहीत. नियमानुसार कपात केलेली रक्कम वेळीच जमा होत नसल्याने निवृत्तीनंतर पीएफच्या रकमेसाठी कर्मचाऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
मनपा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे मागील सहा महिन्यांपासून ३५ कोटी जमा केलेले नाहीत, तर नोव्हेंबर २००५ नंतर मनपा सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. मनपातील जवळपास ६ हजार कर्मचारी या योजनेत येतात. या कर्मचाऱ्यांचे मागील काही वर्षांतील ३६ कोटी त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. यामुळे कर्मचारी व शिक्षकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
....
व्याजाच्या भुर्दंडाला जबाबदार कोण?
कर्मचाऱ्यांचे भविष्य निधी व अंशदान पेन्शन योजनेचे ७१ कोटी त्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत. ही रक्कम मनपा प्रशासनाने दुसऱ्या कामासाठी वापरली. आता मनपाला या रकमेवरील व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच एलआयसीचे हप्ते वेळीच भरले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना दंड भरावा लागतो. या कालावधीत संबंधित कर्मचारी मरण पावल्यास त्यांच्या वारसांना नियमाप्रमाणे लाभ मिळत नाही.
....
मृतकांच्या वारसांना लाभाची प्रतीक्षा
सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केला नसल्याने त्यांच्या वारसांना नियमाप्रमाणे लाभ मिळत नाही. त्यात किती रक्कम जमा झाली. याच्या पावत्या नसल्याने वारसांना नेमकी किती रक्कम जमा आहे, याची त्यांना माहिती नाही.
....
दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
मनपाचे तत्कालीन लेखा व वित्त विभागाचे प्रमुख मदन गाडगे यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात पीएफ व अंशदान पेन्शन योजनेच्या रकमेचा घोळ झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा उपायुक्त निर्भय जैन यांना देण्यात आले होते; परंतु त्यानंतरही यातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. दोषींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना अजूनही सातवा वेतन आयोग लागू केला नाही. वेतन आयोगाची थकबाकी आहे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आदींनी मनपा प्रशासनाला दिला आहे.