दीड वर्षांत बँकांमध्ये ७१ हजार कोटींचे घोटाळे : आरबीआयची आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 08:14 PM2019-03-08T20:14:22+5:302019-03-08T20:15:01+5:30
देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१७-१८ व २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाही अशा एकूण दीड आर्थिक वर्षांत देशातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ७१ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार घोटाळ्याची संख्यादेखील ६७ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१७-१८ व २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाही अशा एकूण दीड आर्थिक वर्षांत देशातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ७१ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार घोटाळ्याची संख्यादेखील ६७ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती. २०१७-१८ ते २०१८-१९ या कालावधीत देशातील वाणिज्यिक बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, वर्षनिहाय आकडा किती होता, इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१७ ते २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये एकूण ६७ हजार ५०७ गैरप्रकार उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये ७१,६८० कोटी ६२ लाख ५५ हजार रुपयांच्या रकमेचा समावेश होता.
वर्षभरात सहकारी बँकांमध्ये ३१ कोटींचे घोटाळे
दरम्यान शहरी सहकारी बँकांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभरात १२९ आर्थिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ८६ कोटी ९७ लाख इतकी होती.
दरदिवशी सरासरी १२३ घोटाळे
२०१७-१८ ते २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाहीत बँकांमध्ये ६७ हजार ५०७ आर्थिक घोटाळे झाले. जर घोटाळ्यांची दिवसनिहाय सरासरी काढली तर प्रत्येक दिवशी देशातील बँकांमध्ये १२३ घोटाळे झाले व घोटाळ्याची रक्कम १३० कोटी ८० लाख इतकी होती.