नागपुरातील ७२ हजार मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:33 PM2020-01-14T21:33:56+5:302020-01-14T21:35:59+5:30
एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्यांनी चावा घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली. मोकाट कुत्र्यांंना आळा घालण्यासाठी महापालिकेने वेळोवेळी नसबंदीची मोहीम राबविली. परंतु त्यात फारसे यश आले नाही. याचा विचार करता आता व्यापक मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली.
मोकाट कुत्र्यांच्या संख्येला वेळीच आळा घातला नाही तर वर्षभरात शहरात दीड लाख मोकाट कुत्रे होतील. पुढील काही वर्षात ही संख्या पाच लाखांवर जाईल. यातून गंभीर समस्या निर्माण होईल. त्यामुळे वेळप्रसंगी एखादा सिमेंट रोड झाला नाही तरी चालेल, परंतु नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. अशी माहिती जोशी यांनी दिली.
मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे वेळोवेळी कुत्र्यांवर नसबंदीची मोहीम राबविण्यात आली होती. हे काम खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. परंतु यात फारसे यश आले नाही. या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात ४ हजार ६२९ लोकांना कु त्र्यांनी चावा घेतल्याची प्रकरणे पुढे आली. तसेच कुत्र्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने आता हा विषय गंभीरतेने घेतला असून व्यापक नसबंदी मोहीम राबविली जाणार आहे.