महिन्यात २६ प्रवाशांचे हरवलेले ७.२१ लाखांचे साहित्य केले परत, आरपीएफची प्रशंसनीय कामगिरी
By नरेश डोंगरे | Published: May 5, 2024 12:09 AM2024-05-05T00:09:11+5:302024-05-05T00:09:29+5:30
गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले.
नागपूर : प्रवासादरम्यान हरविलेल्या माैल्यवान चीजवस्तू आणि रोकड शोधून ज्यांची त्यांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने बजावली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले. हे सामान शोधल्यानंतर नेमके कुणाचे कोणते सामान आहे, याची शहानिशा करून हे सर्व सामान ज्याचे त्याला परत करण्यात आरपीएफने यश मिळवले. रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत किंवा स्थानकावर कुणाचे सामान चोरीला गेले किंवा गडबडीत कुठे राहून गेले तर त्याची तत्काळ प्रवाशांनी तक्रार करावी. असे केल्यास ते सामान लवकरात लवकर शोधून परत करता येते. अनेक प्रवासी उशिरा तक्रार करतात. त्यामुळे तपास उशिरा सुरू होतो आणि ते सामान परत मिळवणेही कठीण होऊन बसते. प्रवाशांनी ही काळजी घेतल्यास त्यांचे सामान परत मिळवून देण्यास अडचण येत नसल्याचे आरपीएफने म्हटले आहे.
सतर्कता बाळगा, माहिती द्या
प्रवाशांनी प्रवास करताना सतर्कता बाळगावी. कसलीही गडबड करू नये किंवा कुणाच्या भूलथापेला बळी पडू नये. कुण्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटत असेल किंवा कुठे काही सामान संशयास्पद अवस्थेत ठेवल्याचे दिसून येत असेल तर त्याची तातडीने रेल्वे पोलिस किंवा रेल्वे सुरक्षा दलाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.