७२६३ दुचाकीचालकांना दणका

By admin | Published: February 9, 2016 02:29 AM2016-02-09T02:29:54+5:302016-02-09T02:29:54+5:30

हेल्मेटसक्तीचा जागर करीत आक्रमक झालेल्या वाहतूक पोलिसांनी सोमवारी नागपुरात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

7263 Bike to Two Wheelers | ७२६३ दुचाकीचालकांना दणका

७२६३ दुचाकीचालकांना दणका

Next

उपराजधानीत हेल्मेटसक्ती सव्वादोनशे पोलिसांवरही कारवाई अनेकांनी शोधल्या पळवाटा
नागपूर : हेल्मेटसक्तीचा जागर करीत आक्रमक झालेल्या वाहतूक पोलिसांनी सोमवारी नागपुरात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. शहरातील सहा झोनमध्ये सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत ‘हेल्मेट मोहीम’ राबवून ७ हजार २६३ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली.दुचाक्यांच्या अपघातात डोक्याला दुखापत झाल्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव असूनही अनेक दुचाकीचालक हेल्मेट वापरण्याचे टाळतात. दरम्यान, दुचाकी अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेटचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी सर्वत्र जागर सुरू असताना पोलीसही सरसावले आहेत.
बनावट पावतीची चर्चा
वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना दिल्या जाणाऱ्या पावतीवर वाहतूक शाखा पोलिसांचा शिक्का (ठप्पा) नव्हता. त्यामुळे अनेक वाहनचालकांकडून उलटसुलट आरोप केले जात होते. या पावत्या बनावट असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली. या संदर्भात वाहतूक शाखेचे उपायुक्त भारत तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, या पावत्या बनावट नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच ही कारवाई असल्यामुळे आणि दुचाकीचालकांच्या हिताचाच त्यामागे उद्देश असल्यामुळे यापुढे ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे तांगडे यांनी लोकमतला सांगितले.
राज्यात अव्वल
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत दुचाकीचालकांवर कारवाई करून नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी राज्यात नवीन विक्रम नोंदवला. आतापावेतो पुणे पोलिसांनी एकाच दिवसात चार हजार दुचाकीचालकांवर अशा प्रकारची कारवाई करून पुणे पोलिसांनी राज्यात नवा विक्रम नोंदवला होता. तो मोडून नागपूर पोलिसांनी आता आपले नाव अव्वलस्थानी आणले आहे.

हेल्मेट खरेदीसाठी वेळ द्या
नागपूर : कारवाईच्या धाकामुळे तरी दुचाकीचालक हेल्मेट घालतील, या हेतूने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम सुरू केली. सकाळपासूनच विविध भागातील रस्त्यांवर पोलिसांनी विनाहेल्मेटने दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. सायंकाळपर्यंत एकूण ७२६३ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये सर्वसामान्य महिला-पुरुष दुचाकीचालकच नव्हे तर विविध खात्याचे कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, तरुण आणि तरुणींचा समावेश आहे. या धडक कारवाईचा फटका शहरातील सव्वादोनशे पोलिसांनाही बसला. कर्तव्यावर जाणाऱ्या, कर्तव्यावर गस्तीवर रस्त्यावरून गणवेशात फिरणाऱ्या २२५ पोलिसांवरही वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.
कारवाई झालेल्यांपैकी ९० टक्के दुचाकीचालकांनी ‘आम्हाला माहिती नव्हते, हेल्मेट घ्यायलाच चाललो’, अशी सबब सांगितली. ती लक्षात घेता मंगळवारी एक दिवस हेल्मेट घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. परिणामी मंगळवारी हेल्मेटची कारवाई शिथिल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबाझरी तलावाकडून हिंगणा टी-पॉईन्टकडे जाताना संत गजानन महाराज मंदिरापासून थोडे पुढे पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या मोटर सायकलचालकांवर कारवाई करण्यासाठी बॅरिकेडस् लावले होते. हिंगणा रोडवर अनेक महाविद्यालये व खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. यामुळे दुपारी १२ वाजतापर्यंत या रोडवर प्रचंड वर्दळ असते. सुमारे ९० टक्के मोटरसायकलचालक हेल्मेट घालून नसतात. (प्रतिनिधी)

जेलसमोर लागल्या वाहनांच्या रांगा
वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत सोमवारी वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहासमोर विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. सायंकाळी ४ वाजता या ठिकाणी ही मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक वाहने अडविण्यात आली. वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने असल्याने रहाटे कॉलनीपुढील सिग्नलपासून ते मध्यवर्ती कारागृहापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीताबर्डी वाहतूक झोनअंतर्गत विविध ठिकाणी मिळून एकूण १४०० कारवाया करण्यात आल्या, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर सोमवारच्या सर्वाधिक कारवाया वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आल्या.
इकडे नव्हती कारवाई
सोमवारी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत प्रस्तुत प्रतिनिधीने प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, माटे चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, दीक्षाभूमी चौक, रामदासपेठ ते लोकमत या भागात फेरफटका मारला असता कुठल्याही ठिकाणी हेल्मेट कारवाई दिसली नाही. विशेष म्हणजे, १० ते ११.३० ही वेळ कार्यालयीन कर्मचारी, शाळा-महाविद्यालये आणि अन्य शासकीय निमशासकीय, खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता महवाची जाण्या-येण्याची वेळ असते. मात्र, या वेळेत उपरोक्त भागात कुठेही पोलिसांची कारवाई आढळली नाही.

Web Title: 7263 Bike to Two Wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.