उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 10:59 AM2022-04-18T10:59:58+5:302022-04-18T11:08:10+5:30

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे.

73% increase in heat stroke patients of six districts in east vidarbha, 4 deaths in Nagpur | उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

Next
ठळक मुद्देपूर्व विदर्भात ११४ रुग्ण, नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक

सुमेध वाघमारे

नागपूर : तापमानात सातत्याने वाढ हात आहे. परिणामी, उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्माघाताचे ४ एप्रिलपर्यंत ३१ रुग्ण असताना, १३ दिवसातच ७२.८० टक्क्याने रुग्णात वाढ झाली. सध्या ११४ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली आहे. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात असून नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडत आहे. यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराच्या नोंदी कमी होत असल्यातरी मार्च ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा व गडचिरोली हे सहा जिल्हे मिळून ३१ रुग्ण व २ मृत्यूची नोंद होती. मात्र, मागील १३ दिवसांतच ८३ रुग्ण व आणखी २ मृत्यूची भर पडली. एप्रिल महिन्याच्या अर्ध्यावरच उष्माघाताच्या रुग्णाने शतक पार केल्याने मे महिन्यात हा आकडा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

नागपूरसह चंद्रपूर, गोंदियात वाढतेय रुग्ण

१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान नागपूर शहरात २६ रुग्ण होते, आता ते वाढून ३४ झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५ रुग्ण होते, आता ४२ झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नसताना आता ३१ रुग्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ५, तर वर्धा जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद आहे. नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्यात तूर्तास एकही उष्माघाताचा रुग्ण आढळून आलेला नाही.

मृत्यूची नोंद संशयित

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण वाढत असले तरी १६ एप्रिलपर्यंत केवळ नागपूर शहरातच ४ मृत्यूची नोंद होती. उपसंचालक आरोग्य विभागाने या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली आहे. शवविच्छेदनचा अहवाल आणि समितीने अंतिम निर्णय घेतल्यावरच उष्माघाताच्या मृत्यूची नोंद होणार आहे.

याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका!

चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळणे किंवा उलटी होणे, पोट दुखणे, गोंधळलेली अवस्था होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. यामुळे गरज असेल तरच उन्हात जा, उन्हात पडताना सैल कपडे घाला, संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्रीचा वापर करा. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा. चांगल्या पद्धतीने ‘हाइड्रेटेड’ राहिल्याने शरीरातून घाम येणे आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

रुग्णांची वाढती संख्या

जिल्हा  :  ४ एप्रिल २०२२  :  १६ एप्रिल २०२२

चंद्रपूर : ०५ : ४२

नागपूर शहर : २६ : ३४

नागपूर ग्रामीण : ०० : ००

गोंदिया : ०० : ३१

गडचिरोली : ०० : ०५

वर्धा : ०० : ०२

भंडारा : ०० : ००

Web Title: 73% increase in heat stroke patients of six districts in east vidarbha, 4 deaths in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.