७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमीटरचा प्रवास; फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे नागपूरमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 01:57 PM2022-10-31T13:57:02+5:302022-10-31T16:15:35+5:30
'हे' बाइकर्स जे करताहेत ते बघून आश्चर्य वाटेल
नागपूर : आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या ७५ बाईकर्सचा ताफा २५ हजार किलोमीटरच्या प्रवासादरम्यान नागपूर येथे रविवारी पोहोचला. नागपूरच्या क्रीडाजगताने या धाडसी प्रवाशांचा उत्साहात सन्मान केला. केंद्र व राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया मोटरबाईक एस्पिटिशन (AIME) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ७५ बाईकर्स हे देशातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार असून या रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता असणाऱ्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून हे सर्व ७५ बाईकर्स स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आरोग्य आणि फिटनेसचा संदेश प्रसारित करून भारतीय वारसा तसेच संस्कृती यावर एक माहितीपट तयार करणार आहेत. ही मोहीम एकूण ७५ दिवसांची असून देशातील ३४ राज्य व केंद्रशासित प्रदेशमधील एकूण २१,००० किमीच्या प्रदेशामध्ये ही मोहीम चालविणार आहेत.
बाईकर्सची रॅली ही पहिल्या टप्प्यात भंडारा येथून नागपूरला आली असून नागपूर येथे झिरो माईल व राजभवनस्थळी भेट दिली. भारताचा मध्यबिंदू असणाऱ्या झिरोमाइल येथील भेटीनंतर या बाईकर्सनी आनंद व्यक्त केला. देशाच्या मध्यबिंदूवरील स्वागताने आम्ही सद्गतीत झालो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे या रॅलीतील सहभागी तरुणांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. येथे द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कारार्थी विजय मुनिश्वर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी तसेच सहायक संचालक भारतीय खेळ प्राधिकरचे श्रीनिवास माळेकर, सहायक संचालक सुमेध तरोळेकर, वरिष्ठ मार्गदर्शक आशिष बॅनर्जी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईकर्सचे स्वागत करण्यात आले.
यावेळी यशस्वी अनिल मोरे हिने कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर अमित हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर योगासाने सादर केली. गांधीनगर, गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल गेम्समध्ये नागपूर जिल्ह्यातील सहभागी झालेल्या १३ खेळाडूंचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती पल्लवी धात्रक यांनी केले. संचालन माया दुबळे यांनी केले. तर श्रीनिवास माळेकर यांनी आभार मानले.