मनपावर ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड : महागाई भत्त्याचे ३० कोटी बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 08:01 PM2020-07-01T20:01:55+5:302020-07-01T20:05:42+5:30
महापालिकेकडे भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे १५१ कोटी थकीत आहे. मागील काही वर्षांत भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने त्यावरील व्याजाचे ५० कोटी तर अंशदान पेन्शन योजनेच्या थकीत रकमेवर २५ कोटी, अशा एकूण ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड मनपाला भरावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेकडे भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेचे १५१ कोटी थकीत आहे. मागील काही वर्षांत भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने त्यावरील व्याजाचे ५० कोटी तर अंशदान पेन्शन योजनेच्या थकीत रकमेवर २५ कोटी, अशा एकूण ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड मनपाला भरावा लागणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेत ९,६०० कर्मचारी आहेत. २००५ पूर्वी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी तर २००५ नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पेन्शन अंशदान रक्कम कपात केली जाते. कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कामासाठी कर्ज देण्याव्यतिरिक्त या रकमेचा वापर करता येत नाही. असे असतानाही मागील काही वर्षांत या रकमेतून १५२.८२ कोटी कंत्राटदारांना देण्यात आले. ही रक्कम वापरल्यानंतर पुन्हा त्या खात्यात जमा केली नाही. यामुळे मनपावर ७५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.
२५०० कोटींचे दायित्व
शहर विकासासोबतच मनपावरील दायित्वाचा भार वाढला आहे. कंत्राटदारांची देणी, केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पातील मनपाचा वाटा, कचरा संकलन कर्जाची परतफेड, पाणीपुरवठा, परिवहन सेवा व एलईडी पथदिवे असे जवळपास २५०० कोटींचे दायित्व मनपावर आहे. त्यात राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून जीएसटी अनुदानात दर महिन्याला ४३ कोटींची कपात केली आहे. कोविड-१९ मुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगर रचना विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.
महागाई भत्ता रोखला
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने एप्रिल महिन्यापासून महागाई भत्ता रोखण्यात आला. कर्मचाऱ्यांना ८४ महिन्यांचा ७० कोटींचा महागाई भत्ता मिळाला नव्हता. गतकाळात आंदोलन केल्यानंतर यातील काही रक्कम मिळाली. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी १८ महिन्यात म्हणजेच मार्च २०२१ पर्यंत सर्व थकबाकी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दर महिन्याच्या वेतनासोबत ही रक्कम मिळत होती. मात्र एप्रिलपासून ती बंद करण्यात आली. जवळपास ३० कोटींची ही रक्कम आहे.
मनपावर असलेली वैधानिक देणी (कोटीत)
मनपा कर्मचारी सेवा निवृत्तिधारक - २९.८६
भविष्य निर्वाह निधी वेतन कपात - ५१.२२
थकीत भविष्य निर्वाह निधीवरील व्याज - ५०
अंशदान निवृत्ती योजना न भरलेली रक्कम - २४.७७ अंशदान निवृत्ती योजनेवरील थकीत व्याज - २५.०१
शिक्षण व रोजगार हमी उपकर - १०६.७८
नासुप्रला वैधानिक देणे - ५६.९१
एकूण वैधानिक देणी - ३४८.५४