मेडिकलसाठी ७५ कोटी रुपये
By admin | Published: May 14, 2017 02:31 AM2017-05-14T02:31:49+5:302017-05-14T02:31:49+5:30
आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल म्हणून शासकीय वैद्यकीय
चंद्रशेखर बावनकुळे : मध्य भारतातील पहिल्या लासिक लेझरचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी दरवर्षी २५ कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षात ७५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागात ३ कोटी १० लक्ष रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या मध्य भारतातील पहिल्या आणि जेजे रुग्णालयानंतर राज्यातील दुसऱ्या अत्याधुनिक लासिक लेझर यंत्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मेडिकलच्या नेत्ररोग विभागातर्फे आयोजित लोकार्पण सोहळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान, प्रशासकीय अधिकारी डॉ. जगदीश हेडाऊ, डॉ. मधुकर परचंड, डॉ. मोना देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
लासिक लेझर या उपकरणामुळे डोळ्यावरील चष्मा लावण्याची आवश्यकता राहणार नसून नेत्ररोगासंबधी विविध आजारावर शस्त्रक्रियेद्वारा उपचार मेडिकलमध्येच उपलब्ध होत असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई नंतर राज्यातील पहिले उपकरण मेडिकलमध्ये सुरू होत आहे. खाजगी रुग्णालयात ५० हजार रुपये येणारा खर्च आता अल्प दरात होणार असल्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवित असल्यामुळे मध्य भारतातील तसेच जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या परिवाराचा एक घटक म्हणून सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरिबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा व उपचार मिळावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य दिले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभिक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलमधील नेत्र विभागात बसविण्यात आलेल्या लासिक लेझर युनिटचा शुभारंभ दीपप्रज्वलित करुन केला. तसेच या अद्ययावत उपकरणांची माहिती घेतली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी नेत्ररोग विभागाच्या सुविधांबद्दल माहिती दिली. लासिक लेझर उपकरण अमेरिकन बनावटीचे आहे. याची किंमत ३ कोटी १० लक्ष रुपये आहे. जिल्हा नियोजन मंडळ विकास निधीतून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. डॉ. मोना देशमुख यांनी आभार मानले, यावेळी नेत्ररोग विभागातील डॉ. मीनल येरावार, डॉ. सौरभ अग्रवाल, राखी खाडे, डॉ. मिलिंद आदी उपस्थित होते.
लासिक लेझर शस्त्रक्रियेमुळे
चष्म्यापासून मुक्ती
नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, नेत्ररोग विभागामध्ये लासिक लेझरमुळे आता प्रत्येकाला चष्म्यापासून सहज मुक्ती मिळणार आहे. त्यासोबतच कार्निया शस्त्रक्रियेसह अवघड शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले आहे. लासिक लेझर उपकरणामुळे अधिक चार ते उणे दहापर्यंत डोळ्यांना नंबर असलेल्या व्यक्तींच्या शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रिया फार कमी दरात येथे उपलब्ध होणार असून मध्य भारतातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. यासाठी २५ रुग्णांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन आयसीयूसाठी ६४ कोटींची गरज
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी यावेळी सांगितले की, मागील दोन वर्षात किडनी रोपणसारख्या अवघड शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. आकस्मिक अपघात विभाग (ट्रामा) साठी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. तीन आयसीयू विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी ६४ कोटी रुपयाची आवश्यकता आहे. स्वच्छतेचे मेडिकल मॉडेल विकसित करण्यात आले असून दररोज संपूर्ण परिसराची स्वच्छता राखण्यात येते. नेत्र विभाग कायम दुर्लक्षित राहात होता परंतु पालकमंत्री बावनकुळे यांच्यामुळे लासिक लेझरसारखे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बायोमासच्या धर्तीवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती
मेडिकल तसेच शासकीय रुग्णांलयातील निघणाऱ्या सर्व कचऱ्यावर बायोमासच्या आधारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
शासकीय रुग्णालये सौरऊर्जेवर आणणार
रुग्णालय परिसराची स्वच्छता व चांगल्या सुविधा निर्माण करताना सौरऊर्जेवर दिवसभर नियमित वीज पुरवठा करता येईल अशा प्रकारचा प्रकल्प महाऊर्जेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. अशाच प्रकारचा प्रकल्प मेयो, डागा व इतर शासकीय हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासंदर्भात बैठक बोलावण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.