नागपूरसह भारतातील ७५ वारसा स्थळी ‘योग-साधना’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:04+5:302021-06-21T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे भारतातील ७५ वारसास्थळी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे भारतातील ७५ वारसास्थळी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. यात नागपुरातील जुने उच्च न्यायालयाच्या इमारतीसह आगाखान पॅलेस -पुणे, कान्हेरी लेणी-मुंबई आणि वेरुळ लेणी-औरंगाबाद या महाराष्ट्रातील चार वारसा स्थळांचा समावेश आहे.
केंद्रीय संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी 'योग-एक भारतीय वारसा या अभियानांतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात येत आहे. योग दिवस देशातील ७५ सांस्कृतिक ठिकाणी साजरा केला जाईल आणि ४५ मिनिटे योगाभ्यास त्यानंतर ३० मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येतील. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील चार स्थळे निवडली गेली आहेत. केंद्राने संरक्षित केलेली राष्ट्रीय महत्त्वाची अशी ही चार स्मारके आहेत.
आगाखान पॅलेस- पुणे आणि कान्हेरी लेणी- मुंबई ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागांतर्गत(मुंबई सर्कल) येतात, वेरुळ लेणी-औरंगाबाद, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या, औरंगाबाद विभागात(औरंगाबाद सर्कल) तर , जुनी उच्च न्यायालय इमारत- नागपूर हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नागपूर विभागांतर्गत येतात.
आगाखान पॅलेस पुणे आणि जुने उच्च न्यायालय इमारत, नागपूर येथे अनुक्रमे मुंबई सर्कल आणि नागपूर सर्कल अंतर्गत योग प्रशिक्षक सकाळी ७ ते सकाळी ७.३०या दरम्यान योग साधना सादर करतील आणि दक्षिण-मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र,नागपूरद्वारे सकाळी ७.३० ते ८.१५ पर्यंत,सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. तसेच मुंबई सर्कल आणि औरंगाबाद सर्कल यांच्या द्वारे , कान्हेरी लेणी-मुंबई येथे आणि औरंगाबाद सर्कल -वेरूळ लेणी येथे अनुक्रमे , योग प्रशिक्षक सकाळी ७ ते सकाळी ७.३०या दरम्यान योग साधना सादर करतील आणि त्यानंतर संगीत नाटक अकादमीद्वारे सकाळी ८.१५ पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.