लॉकडाऊनच्या ५० दिवसात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:10 AM2020-05-13T00:10:44+5:302020-05-13T00:21:05+5:30
केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यापाऱ्यांना वेबिनारद्वारे संबोधित करताना दिली.
भरतीया म्हणाले, लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल दिसून येणार असून बाजारपेठांमध्ये केवळ २० टक्के ग्राहक येण्याची शक्यता आहे. अनेकांचा ऑनलाईनवर भर राहणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही सज्ज राहावे लागेल. कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये पुढेही राहणार असून ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणार नाहीत. या वित्तीय संकटामुळे लॉकडाऊन हटल्यानंतर देशातील किमान २० टक्के व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. अशा संकटसमयी रिटेल व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या नवीन तऱ्हा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. व्यापाऱ्यांना ग्राहककेंद्रित वातावरण तयार करावे लागेल, याशिवाय डिजिटल आणि संपर्करहित भुगतान आणि आयटीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच डिजिटल ई-कॉमर्ससह भौतिक दुकानाचे एकीकरण, नियम आणि कायद्याचे पालन केल्यास व्यापाऱ्यांना बदलत्या परिस्थितीत सक्षम होता येईल.
भरतीया म्हणाले, कोविड-१९ ने भारतीय रिटेल व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायाचे भविष्य संकटात आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर व्यवसाय सुरू होण्यास किमान तीन महिने लागतील. डिसेंबर २०२० पर्यंत व्यवसाय सुरळीत होईल. सध्या देशातील रिटेल व्यापाºयांना नवरात्री ते दिवाळीत होणाऱ्या व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली असून दिवाळीत खर्च करतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यावर व्यापारी अवलंबून आहेत. भरतीया म्हणाले, आता बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारातही बदल होणार आहे. एकल अथवा खासगी व्यवसायाऐवजी आपसी सहयोगाचा अवलंब व्यापाऱ्यांना करावा लागणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यवहारात बदल घडवून आणावा लागेल.