नागपुरात आणखी ७५ ओमायक्रॉनबाधित; आतापर्यंत २०१ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 09:56 PM2022-01-18T21:56:42+5:302022-01-18T21:57:19+5:30
सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.
नागपूर : सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.
‘नीरी’ने आतापर्यंत तीन टप्प्यात २०१ कोरोनाबाधितांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. त्यातील दोन वगळता उर्वरित १९९ नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असल्याचे आढळून आले. ज्या नागरिकांमध्ये हा व्हेरिएंट आढळला, त्यातील ९९ टक्के स्थानिकच आहेत. त्यांचा प्रवासाचा कुठलाही इतिहास नाही. स्थानिक पातळीवर ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
११ ते १६ जानेवारीदरम्यान ‘नीरी’ने कोरोनाबाधितांच्या ७५ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. त्यातील सर्वच नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला. ही आकडेवारी सरकारी डेटामध्ये अपलोड झालेली नाही. पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत जे नमुने ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठविण्यात आले आहेत, तेच सरकारी पातळीवर अपलोड होतात, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. हैदराबादमधील प्रयोगशाळेच्या सहकार्याने ‘नीरी’तर्फे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात येत आहे. ९ जानेवारीपासून ‘नीरी’ने ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ची सुरुवात केली. पहिल्यांदा ५३, दुसऱ्यांदा ७३ व तिसऱ्या वेळी ७५ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले, अशी माहिती ‘नीरी’च्या ‘एन्व्हायर्नमेंटल व्हायरोलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा खैरनार यांनी दिली.