पहिल्यांदाच केली कवटीची ७५ टक्के पुुनर्रचना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 08:45 AM2022-03-01T08:45:00+5:302022-03-01T08:45:02+5:30
Nagpur News म्युकरमायकोसिस झालेल्या तरुणाच्या कवटीचे ७५ टक्के नुकसान झाले होते. त्याच्या कवटीच्या पुनर्रचनेची जबाबदारी घेत नागपुरात ही मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
सुमेध वाघमारे
नागपूर : एका ३० वर्षीय तरुणाला झालेला म्युकरमायकोसीमुळे कवटीच्या ७५ टक्के भागाचे नुकसान झाले. शस्त्रक्रिया करून कवटीचा भाग काढण्यात आला. चेहरा विद्रूप झाला. मेंदूला थेट इजा होण्याची जोखीम होती. अडचण होती ती, एवढ्या मोठ्या आकारातील कवटीच्या पुुनर्रचनेची. नागपूरच्या युवकांनी याची जबाबदारी घेतली. मोठ्या परिश्रमाने ‘टायटॅनियम’ धातूच्या मदतीने ती तयार केली. डॉक्टरांनी त्याचे यशस्वी प्रत्यारोपण केल्याने तरुणाला जीवनदान मिळाले. एवढ्या मोठ्या आकारातील कृत्रिम कवटी तयार करण्याची व त्याचे प्रत्यारोपण करण्याची भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
केरळ येथील मूळ रहिवासी असलेला या तरुणाला २०२० मध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे (काळी बुरशी) निदान झाले. दुर्दैवाने निदान होईपर्यंत काळी बुरशी कवटीवर मोठ्या प्रमाणात पसरली. बुरशी आणखी पसरू नये यासाठी केरळ कोची येथील व्हीपीएस लेकशोर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. जवळपास ७५ टक्के कवटीचा भाग काढून टाकण्यात आला. त्याच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. कवटी नसल्याने चेहरा विद्रूप झाला होता. तरुणाचा आत्मविश्वास ढासळला. मेंदूला धोका होण्याची शक्यता होती. यामुळे कृत्रिम कवटी तयार करून तो लावण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढ्या मोठ्या आकारात कृत्रिम कवटी तयार होण्यावर शंका होती. परंतु नागपुरातील ‘लुसीड इम्प्लांट’ या कंपनीने तयारी दर्शवली. त्यांनी थ्रिडी प्रिंट आधारे ‘टायटॅनियम’ धातूची ‘क्रॅनियल इम्प्लांट’ म्हणजे कृत्रिम कवटी तयार केली. व्हीपीएस लेकशोर हॉस्पिटलचे वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. अरुण ओमन व न्युरोसर्जन डॉ. सुदिश करुणाकरन यांनी सलग तीन तास शस्त्रक्रिया करून ती बसवली. या शस्त्रक्रियेला ‘क्रॅनियोप्लास्टी’ म्हणतात. उपचारानंतर नुकतेच रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
-४२ टक्क्यांपर्यंत कृत्रिम कवटी तयार करण्याचा अनुभव
‘लुसीड इम्प्लांट’चे संचालक प्रशांत रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या तरुणाचे प्रकरण येण्यापूर्वीपर्यंत आम्हाला ४० ते ४२ टक्क्यांपर्यंत कृत्रिम कवटी तयार करण्याचा अनुभव होता. यामुळे ७५ टक्के कृत्रिम कवटी तयार करण्याचे आमच्या पुढे आव्हान होते. परंतु अनुभव, कौशल्य व तंत्रज्ञानाच्या मदतीने ते यशस्वी केले. ही कवटी रुग्णासाठी पूर्णत: सुरक्षित आहे.