हावडा-मुंबईच्या अपघातामुळे बिघडले लाखो प्रवाशांचे नियोजन
By नरेश डोंगरे | Published: July 30, 2024 11:07 PM2024-07-30T23:07:22+5:302024-07-30T23:07:39+5:30
अनेक गाड्यांचे मार्ग बदलविले : नागपूर मार्गे धावणाऱ्या सहा गाड्या रद्द.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हावडा येथून मुंबईकडे निघालेल्या गाडी क्रमांक १२८१०ला चक्रधरपूर विभागात अपघात झाल्याने लाखो प्रवाशांचे नियोजन बिघडले आहे. नागपूर मार्गे धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
हा अपघात नागपूरपासून बऱ्याच दूर अंतरावर झाला असला तरी अपघातामुळे नागपूर-हावडा अप आणि डाऊन दोन्ही लाईन ठप्प झाल्या आहेत. परिणामी, अपघातानंतर नागपूर-हावडा आणि हावडा-नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांना वेगवेगळ्या स्थानकांवर रोखण्यात आले. अपघातग्रस्त गाडीत नागपूर-विदर्भातील प्रवासीही असण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून त्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, रेल्वेच्या नागपूर विभागाने तीन वेगवेगळे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. दरम्यान, अनेक गाड्या रद्द झाल्याने आणि अनेक गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आल्याने लाखो प्रवाशांचे नियोजन बिघडले असून, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रद्द केलेल्या गाड्या
१२१०१ शालीमार एक्स्प्रेस मंगळवारी, ३० जुलैला तसेच १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस आणि २२९०६ शालीमार ओखा एक्स्प्रेस ३० जुलैला रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे १२२६२ हावडा सीएसएमटी एक्स्प्रेस, १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस आणि १२७६८ संत्रागाची- नांदेड एक्स्प्रेस ३१ जुलैला रद्द करण्यात आली.
मार्ग परिवर्तित गाड्या
१२८३४ हावडा-अहमदाबाद ही गाडी बुधवारी, ३१ जुलै रोजी टाटा-चांडिल-पुरुलिया जंक्शन-हटिया-रौरकेला जंक्शन मार्गे आणि १२८१० हावडा-सीएसएमटी ३१ जुलैला टाटा-चांडिल-पुरुलिया जंक्शन-हटिया-रौरकेला जंक्शन मार्गे धावणार आहे. त्याचप्रमाणे १२१३० हावडा-पुणे, १८००५ हावडा-जबलपूर, १२८३४ हावडा-अदिलाबाद, १८४७७ पुरी एक्स्प्रेस, १८०२९ एलटीटी शालीमार एक्स्प्रेस, १२८५९ सीएसएमटी हावडा, १२८३३ आदिलाबाद-हावडा एक्स्प्रेस काजीपेठ बल्लारशाह मार्गे धावणार आहे.