अकरावी, बारावीत ७५ टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; अन्यथा कारवाई, शाळेची मान्यताही हाेऊ शकते रद्द
By निशांत वानखेडे | Published: July 14, 2024 07:14 PM2024-07-14T19:14:49+5:302024-07-14T19:15:37+5:30
नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्याने गैरहजर आढळल्यास अशा विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेशात दिला आहे.
नागपूर : खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलाेटे करून तेथील विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना यापुढे माेठ्या कारवाईस सामाेरे जावे लागण्याची शक्यता आहे. यापुढे प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी विद्यालयांना घ्यावी लागेल. नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्याने गैरहजर आढळल्यास अशा विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेशात दिला आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी ८ जुलै राेजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शहरातील व बाहेरील अनेक विद्यालयांचे खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलाेटे असते व त्यामुळे या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश दिले जात असल्याच्या माैखिक व लेखी तक्रारी प्राप्त हाेत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविना शाळा सुरू आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे. एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांची नियमित वेळापत्रकानुसार उपस्थिती आढळून आली नाही, त्यांना बाेर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशीही ताकीद या आदेशात देण्यात आली आहे.
या आदेशातील इतर महत्त्वाच्या सुचना
- संच मान्यतेनुसार मान्य तुकड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेता येणार नाही. असे प्रवेश झाल्यास वाढीव प्रवेशांना मान्यता देण्यात येणार नाही.
- शासन निर्णय धाेरणानुसार विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच घेण्यात यावी.
- नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११ वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच हाेणे बंधनकारक आहे. ऑफलाईन प्रवेशास मान्यता देण्यात येणार नाही. अशा प्रवेशांची संचमान्यतेत नाेंद घेतली जाणार नाही.
- ऑफलाईन प्रवेश घेतलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहिल.
- शाळेत मुलांमुलींचे स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ग्रंथालय, प्रयाेगशाळा आदी व्यवस्था सुसज्जित असाव्या.
- वेळापत्रकानुसार शिक्षकांच्या नियमित तासिका असाव्या. प्रयाेगशाळेतील प्रात्याक्षिक नियमित वेळापत्रकानुसार घेण्यात यावे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्या
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी महिन्यातून किमान २ कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक विद्यालयांना भेटी द्याव्या. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान ३ विद्यालयांना भेटी द्याव्या. हजेरी पटावरील विद्यार्थी उपस्थिती आहेत की नाही, वेळापत्रकानुसार विषयनिहाय वर्ग सुरू आहेत की नाही, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती व मूलभूत साेयी सुविधांची तपासणी करावी.