ग्रा.पं.साठी ७५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:25 AM2017-10-17T00:25:35+5:302017-10-17T00:26:14+5:30
जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे. मतदान प्रक्रियेत तुरळक अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचा दावा निवडणूक अधिकाºयांनी केला आहे. २३७ ग्रा.पं.च्या सरपंचासह सदस्यपदाच्या उमेदवारांचे भाग्य सोमवारी मशीनबंद झाले. मंगळवारी तालुकास्तरावर मतमोजणी होऊन त्यांच्या भाग्याचा फैसला होईल.
नरखेड तालुक्यात २२, काटोल २७, कळमेश्वर २३, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७,
भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचे आज ९०० मतदान केंद्रांवर मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह होता, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर जाणवला. कामठी तालुक्यातील रनाळा ग्रा.पं.मध्ये बोगस मतदान झाल्याची माहिती आहे. सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथेही बोगस मतदान झाल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. मौदा तालुक्यातील माथनी, नरखेड तालुक्यातील मेंढला येथे इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडून तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणीला तालुकास्तरावर सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील २३७ गावांमध्ये दोन दिवसांपूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे.
रात्री ८ पर्यंत चालले मतदान
तारसामध्ये वॉर्ड क्र. ५ या मतदान केंद्रावर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. मतदान प्रक्रिया संपण्यापर्यंत मतदान केंद्राबाहेरही रांगा होत्या. त्यामुळे ५.३० पर्यंत जे मतदार रांगेत होते त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला रात्री ८ वाजले. तिथे मतदानाची टक्केवारी ८५.९१ टक्के नोंदविण्यात आली.
दुपारी ३.३० पर्यंत ६३.५५ टक्के मतदान
मतदानाला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद होता. पहिल्या तीन तासात जवळपास चार लाखाहून अधिक मतदान झाले होते. १.३० वाजेपर्यंत जवळपास ४५.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ६३.५५ टक्के मतदान झाले होते. यात सर्वाधिक मतदान हे काटोल तालुक्यात ७६.५ टक्के तर सर्वात कमी मतदान रामटेक तालुक्यात ५७.७९ टक्के झाले होते.