वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला साडेसातशे कोटींचा बुस्ट; आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज

By नरेश डोंगरे | Published: February 1, 2024 10:54 PM2024-02-01T22:54:11+5:302024-02-01T22:54:21+5:30

महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतीमान होणार आहे.

750 crores for Wardha-Yavatmal-Nanded railway line; | वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला साडेसातशे कोटींचा बुस्ट; आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला साडेसातशे कोटींचा बुस्ट; आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज

नरेश डोंगरे

नागपूर : महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतीमान होणार आहे. आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला साडेसातशे कोटींच्या तरतुदीचे आर्थिक इंजिन जोडले गेले आहे. मात्र, जाणकारांच्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी आणखी अडीच ते पावणेतीन हजार कोटींची गरज भासणार आहे.

२८४.६५ किलोमीटर लांबीचा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग ज्यावेळी मंजूर झाला होता त्यावेळी त्यासाठी २७४.५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, मध्यंतरी प्रकल्प रेंगाळल्याने त्याचे बजेटही वाढले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांनी या संबंधाने राज्य तसेच केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दर्डा यांच्या प्रयत्नामुळेच राज्य सरकारने या प्रकल्पासाठी स्पेशल वॉर रूम तयार केली. या कामात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना दिल्या आणि निधीही उपलब्ध करून दिला. त्याचमुळे गेल्या काही वर्षांत या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर, आतापावेतो १९१० कोटी, ७ लाख रुपये खर्च झाले असून त्यातून वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. ताशी १२५ किलोमीटर वेगाने रेल्वे गाडी चालवून देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही पार पडली आहे. त्यामुळे वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी आधी १२ जानेवारी २०२४ चा मुहूर्त ठरविण्यात आला होता. नंतर ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, आज जाहिर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपयांची तरतुद जाहीर झाली. तथापि, एवढ्याने भागणार नाही तर आणखी ३ हजार ४४५.४८ कोटी रुपये खर्च या मार्गासाठी अपेक्षित असल्याचे जाणकार सांगत आहेत. तो तातडीने उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणीही पुढे आली आहे.

तरतुदीचे स्वागत, पुरेशी नाही : डॉ. विजय दर्डा

लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्याशी या संबंधाने चर्चा केली असता त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मात्र, वर्धा - यवतमाळ - नांदेड प्रकल्पाचे ७५० कोटींने भागणार नाही. त्यासाठी आवश्यक संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध करून दिला जावा आणि हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पुर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव चांगली पावलं उचलत आहेत. सर्वसामान्य व्यक्तींचे दळणवळणाचे रेल्वे मुख्य साधन आहे. त्याचे नुतनीकरण होत आहे, हे काैतुकास्पद असल्याचे डॉ. दर्डा यांनी म्हटले. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना सुलभ जाणे-येणे करता यावे यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर एस्केलेटर सुरू करावे. देशातील सर्व ठिकाणचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करून उड्डाण पुल किंवा भुयारी मार्गाची निर्मिती करावी तसेच अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी मागणी वजा अपेक्षाही डॉ. दर्डा यांनी व्यक्त केली.

Web Title: 750 crores for Wardha-Yavatmal-Nanded railway line;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.