प्रवेशाच्या नावावर ७.५० लाखाने फसविले

By admin | Published: February 11, 2017 02:45 AM2017-02-11T02:45:05+5:302017-02-11T02:45:05+5:30

बीएएमएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयाने फसवणूक

7.50 lakh fraud in the name of admission | प्रवेशाच्या नावावर ७.५० लाखाने फसविले

प्रवेशाच्या नावावर ७.५० लाखाने फसविले

Next

स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकास अटक : साथीदारांचा शोध सुरू
नागपूर : बीएएमएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणि स्पर्धा परीक्षात देत असलेल्या युवकास तहसील पोलिसांनी अटक केली. मनीष कोरडे (२६) शिवसेना चौक, चिटणीसनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याची साथीदार ज्योत्स्ना त्यागी (४२) रा. मनीषनगर आणि रोहित कनोजिया (२५) रा. झिंगाबाई टाकळी फरार आहेत. आरोपींनी अनेकांची या प्रकारे फसवणूक केल्याचा संशय आहे.
गोळीबार चौक येथील वनश्री उमरेडकर यांच्या मुलीला बीएएमएसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. वनश्री यांची मनीषसोबत ओळख आहे. त्यांच्या एका नातेवाईकांच्या मुलीसोबतच मनीषचे लग्न होणार होते. पदवीधर असलेला मनीष स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्यामुळे वनश्री यांना त्याच्यावर विश्वास होता. मनीषने ज्योत्स्ना व रोहितसोबत वनश्री यांची ओळख करून दिली. त्यांनी वनश्री यांच्या मुलीला उमरेड रोडवरील एका खासगी महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला. वनश्री यांना आरोपींच्या बोलण्यावर विश्वास बसला.
आरोपी महिलेला कॉलेजमध्ये घेऊन गेले. तिथे एका ठिकाणी त्यांना बसविले व प्राचार्यांनी प्रवेशासाठी होकार दिल्याचे सांगितले. यानंतर कॉलेज संचालकांच्या बंगल्यावरही घेऊन गेले. वनश्रीला बंगल्याच्या एका दालनात बसविले. कॉलेज संचालक मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगून महिलेला परत पाठविले. आरोपींनी वनश्री यांच्याकडून जून २०१६ ते जुलै महिन्यादरम्यान साडेसात लाख रुपये घेतले. यानंतर प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते संचालक व इतर लोकांशी फोनवर बोलून महिलेला प्रभावित करायचे. अनेक दिवस असाच प्रकार सुरू होता. शेवटी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी लागली तेव्हा त्यात मुलीचे नाव नसल्याने वनश्री चिंतेत पडल्या.
आरोपींनी त्यांना आणखी काही दिवस शांत राहण्यास सांगितले. परंतु वारंवार टाळाटाळ होत असल्याने महिलेला त्यांच्यावर संशय आला. त्यांनी आपले पैसे परत मागितले. यानंतर आरोपी फरार झाले. वनश्री यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच ज्योत्स्ना त्यागी भाड्याचा फ्लॅट खाली करून गायब झाली. रोहित कनोजिया सुद्धा फरार झाला.
तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनीष कोरडेला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 7.50 lakh fraud in the name of admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.