नागपूर जिल्ह्यात ७५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 11, 2024 09:02 PM2024-03-11T21:02:28+5:302024-03-11T21:02:44+5:30
- रोजगार आणि विकासाला चालना मिळणार
नागपूर: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने उद्योग संचालनालयाने आयोजित केलेल्या ‘नागपूर जिल्हा गुंतवणूकदार समिट’मध्ये नागपुरातील उद्योगांनी ७,५०० कोटी रूपयांचे सामंजस्य करार केले. यामध्ये नोव्हासिस, मदर डेअरी, कॉन्फिडन्स ग्रुप, कलर शाइन इंडिया, वैभव प्लास्टो, आरसी प्लास्टो टँक, एसबीएल एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे.
गुंतवणुकीला आकर्षित करून विकासाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जिल्हे सक्षम बनवण्यासाठी या शिखर परिषदेचे आयोजन वनामती येथे करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील आर्थिक वाढ आणि विकासाच्या संधी शोधण्यासाठी प्रमुख भागधारक, उद्योग तज्ज्ञ आणि संभाव्य गुंतवणूकदारांना एकत्र आणण्याचा हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. ते म्हणाले, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेच्या क्षेत्रात नागपूरचा सकारात्मक पुढाकार आहे. नागपुरातील उद्योगांनी ७,५०० कोटी रुपयांचे करार केले आहेत. नागपुरातील नोव्हासिस, मदर डेअरी, कॉन्फिडन्स ग्रुप, कलर शाइन इंडिया, वैभव प्लास्टो, आरसी प्लास्टो टँक, एसबीएल एनर्जी या प्रमुख कंपन्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याशिवाय केंद्रीय जीएसटी विभाग नागपूरचे सहायक आयुक्त संजय थूल यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. डीआयसीचे सहसंचालक भारती यांनी परिषदेची संकल्पना मांडली आणि सरकारकडून उद्योगांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतींची माहिती दिली.
कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, व्हीआयए अध्यक्ष विशाल अग्रवाल, बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, एलयूबीचे अध्यक्ष रवलीन सिंग खुराना हे व्यासपीठावर होते. त्यांनी उद्योगांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. परिषदेत डीआयसीचे महाव्यवस्थापक एस.एस. मुद्दमवार, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी महेंद्र पटेल, सिडबीचे सहायक महाव्यवस्थापक संतोष मोरे, वैभव अग्रवाल, सीए नितीन अग्रवाल, सीए संजय मधराणी, अजय राठोड यावेळी उपस्थित होते. संचालन पराग आठवले यांनी केले.