नागपुरात कोरोनाबाधितांचे ७५ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:11 AM2020-09-29T00:11:36+5:302020-09-29T00:15:35+5:30
कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्येवरही याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. नागपूर जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधितांचा वेग वाढला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत मोठ्या संख्येत रुग्णांची भर पडली. यामुळे चाचण्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आज सर्वाधिक कमी म्हणजे, २७०१ चाचण्या झाल्या. यात ११८५ आरटीपीसीआर चाचण्या असून रॅपिड अॅन्टिजेनच्या १,५१६ चाचण्या आहेत. एम्सच्या प्रयोगशाळेतून ५३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ११०, मेयोच्या प्रयोगशाळेतून १८०, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६७ तर खासगी लॅबमधून २८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. -२८ दिवसांत ४६ हजार रुग्णांची नोंद आॅगस्ट महिन्यात रुग्णाची एकूण संख्या २९,५५५ होती. जुलै महिन्याच्या तुलनेत २४,१६३ रुग्णांची भर पडली. परंतु सप्टेंबर महिन्यातील या २८ दिवसांतच ४६ हजार २६० रुग्णांची नोंद झाली. मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आॅगस्ट महिन्यात ९१९ मृत्यू होते. तर या महिन्यात आतापर्यंत १,५१९ मृत्यूची भर पडली आहे. यामुळे पुढील महिन्यात भयावह आकडेवारी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. -१४३१ रुग्ण बरे मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या तुलनेत जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. सोमवारी १,४३१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५९,६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून याचे प्रमाण ७८.७४ टक्के आहे. यात शहरातील ४८,१२३ तर ग्रामीण भागातील ११,५७४ रुग्ण आहेत. सध्या १३,६८० रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत भरती आहेत. -कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या घटली नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने २०वर कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले आहेत. होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र सुरुवातीला महत्त्वाचे ठरले. परंतु आता रुग्ण ‘सीसीसी’मध्ये राहण्यापेक्षा होम आयसोलेशनमध्येच राहणे पसंत करीत आहेत. होम आयसोलेशनच्या कठोर नियमांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने घरातील इतर लोकांना लागण होत असल्याचे समोर आले आहे. सध्या ८,७५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर सीसीसीमध्ये हजारही रुग्ण नाहीत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ४,१९३
बाधित रुग्ण :७५,८१५
बरे झालेले : ५९,६९७
उपचार घेत असलेले रुग्ण : १३,६८०
मृत्यू : २,४३८