७५० ग्राम सोने चोरीचे प्रकरण : तब्बल पाच वर्षानंतर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:56 AM2019-03-24T00:56:04+5:302019-03-24T00:57:03+5:30
पंजाबमधील सराफा व्यापाऱ्याचे ७५० ग्राम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाबमधील सराफा व्यापाऱ्याचे ७५० ग्राम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल केला. अमृतसर (पंजाब) च्या कस्टम कॉलनीत राहणारे सराफा व्यावसायिक रमण रोशनलाल कक्कड (वय ५९) आणि त्यांचा लहान भाऊ सुरेश कक्कड १२ जुलै २०१४ ला अमृतसरहून नागपूरला आले होते. त्यांनी १ किलो, ९०० ग्राम सोन्याचे दागिने येथे आणले होते. लकडगंज, इतवारीतील रेशीम ओळीत असलेल्या जैन धर्मशाळेत ते मुक्कामी थांबले होते. १२ ते १८ जुलै २०१४ च्या कालावधीत त्यांनी यातील १ किलो १५० ग्राम दागिन्यांची शहरातील व्यावसायिकांना विक्री केली तर, २० लाख, ५२ हजार रुपये किंमतीचे ७५० ग्राम दागिने त्यांनी एका ब्रिफकेसमध्ये ठेवून ती धर्मशाळेत घेतलेल्या रूममधील कपाटात ठेवली होती. त्यानंतर रमण कक्कड गोंदियाला तर त्यांचे बंधू सुरेश मुंबईला निघून गेले. २२ जुलैला परत आले तेव्हा त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी रोहित बळीराम बोकडे (वय २७,. लालगंज कुंभारपुरा, शांतिनगर), तानाजी मोरे सह अन्य काही जणांविरुद्ध २२ जुलैला लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे टाळल्याने २३ जुलैला कक्कड ठाण्यात आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने कारवाई करत नसाल तर राहू द्या, असे नाराजीने म्हटले. पोलिसांनी त्यांना तसे लिहून देण्यास सांगितले असता कक्कड यांनी एफआयआर दाखल करायचा नाही, असे पोलिसांकडे २३ जुलैला लिहून दिले. त्यानंतर वरिष्ठांकडे या प्रकरणाची तसेच लकडगंज पोलिसांची तक्रार पाठवली. उच्च न्यायालयातही रिट पीटिशन दाखल केली. या संबंधाने कोर्टाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांनी अमृतसरच्या कक्कड यांना नागपुरात बोलवून घेतले आणि त्यांची नव्याने तक्रार नोंदवून घेत शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
एकाला अटक, बाकी फरार
हे प्रकरण पोलिसांच्या अंगावर शेकू शकते. ते ध्यानात आल्यामुळे लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल होण्याच्या काही तासातच आरोपी बोकडेला अटक केली. त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.