शेतकऱ्यांना ७५५ मे. टनाहून अधिक खतांचे बांधावर वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:16+5:302021-06-09T04:09:16+5:30
नागपूर : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या गटांमार्फत कृषी विभागाने आजवर ७५५ मेट्रिक टनाहून अधिक रासायनिक खते ...
नागपूर : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या गटांमार्फत कृषी विभागाने आजवर ७५५ मेट्रिक टनाहून अधिक रासायनिक खते प्रतिनिधिक स्वरुपात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविली असून, ही प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पैशाचीही बचत होत आहे.
खरीप हंगाम २०२१ करिता जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, सर्वाधिक क्षेत्र कापूस पिकाखाली २ लाख १ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, धान ९६००० तर सोयाबीन पिकाखाली ८५००० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाला १.४५ लाख मेट्रिक टनावरचे खताचे आवंटन झाले आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची पायपीट होऊ नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी आवाहन केल्याने जिल्हाभरातील विविध १२० हून अधिक शेतकरी विकास गट हे बांधावर खत वाटप मोहिमेत काम करण्यासाठी समोर आले. या गटांनी शेतकऱ्यांची नावे व त्यांना लागणाऱ्या खतांची नोंदणी केली व ते थेट त्यांच्या बांधावर पोहोचविले. जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी गटांमार्फत ७५५ मेट्रिक टनाहून अधिक खते वितरीत झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च आणि हमाली असा एकूण ३० ते ३५ रुपये प्रतिबॅग खर्च वाचल्याचे सांगण्यात येते. तसेच त्याहून ही लॉकडाऊनच्या काळात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खत घेऊन येण्याची पायपीटही थांबली. दुकानात गर्दी न केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासही प्रतिबंध लागला आहे.