नागपुरात अॅडमिशनच्या नावाखाली ७६ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:59 AM2018-12-12T00:59:52+5:302018-12-12T01:00:45+5:30
प्रशिक्षणानंतर लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची हमी देऊन कबीर इन्फोटेकच्या संचालकाने ३२० बेरोजगारांकडून ७६ लाख रुपये हडपल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रशिक बंसोड (वय ३४), निशांत लखाते (दोन्ही रा. वृंदावन सोसायटी, नागपूर), प्रशांत बोरकर (वय ३६, रा. मेडिकल चौकाजवळ) आणि राजकुमार देवधरे (वय ३८, रा. दिघोरी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशिक्षणानंतर लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची हमी देऊन कबीर इन्फोटेकच्या संचालकाने ३२० बेरोजगारांकडून ७६ लाख रुपये हडपल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रशिक बंसोड (वय ३४), निशांत लखाते (दोन्ही रा. वृंदावन सोसायटी, नागपूर), प्रशांत बोरकर (वय ३६, रा. मेडिकल चौकाजवळ) आणि राजकुमार देवधरे (वय ३८, रा. दिघोरी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
उपरोक्त आरोपींनी इम्पेरियल प्लाझाच्या पाचव्या माळ्यावर कबीर इन्फोटेक कंपनीचे कार्यालय सुरू करून, २ जून २०१८ पासून बेरोजगार अभियंत्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण आणि नंतर २५ ते ५० हजार रुपये महिना पगाराची नोकरी देण्याची हमी देणे सुरू केले. त्यामुळे बंसोडच्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी धाव घेतली. बंसोडने रामनगरातील कार्यालयात प्रशिक्षण तसेच हिंगण्यातील कंपनी प्लांटमध्ये नोकरी देण्याची बतावणी केली होती. मात्र, तो प्रशिक्षणापूर्वी नोकरी इच्छुकांकडून २५ हजार, ५० हजार किंवा एक लाख रुपये सुरक्षा ठेव घेत होता. अशाप्रकारे त्याने ३२० बेरोजगारांकडून ७६ लाख रुपये उकळले. जूनमध्ये कथित प्रशिक्षणानंतर त्याने पहिल्या तुकडीला नोकरीच्या नावाखाली प्लांटमध्ये नियुक्ती दिली. पहिल्या तीन महिन्यातच त्याचे पितळ उघडे पडल्याने पगाराची बोंबाबोंब झाली. त्यामुळे पीडितांना शांत करण्यासाठी त्याने कंपनीत काही जणांनी आर्थिक घोळ केल्याने कंपनीला मोठा फटका बसला आहे; मात्र लवकरच कंपनीची आर्थिक स्थिती चांगली होईल, असे म्हणत संबंधितांचा रोष दाबला. त्यांना पगाराच्या नावाखाली ५ ते ७ हजार रुपये दिले. त्यानंतर बंसोडने टाळाटाळ सुरू केल्याने संबंधितांचा रोष वाढत गेला. दरम्यान, चार ते पाच दिवसांपासून बंसोड बेपत्ता झाल्याने संबंधित तरुणांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने संबंधित तरुणांनी रविवारी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तरुणांनी सीताबर्डी ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून बंसोडविरुद्ध नारेबाजी केली. त्याला तातडीने अटक करा, अशी त्यांची मागणी होती. ठाणेदार हेमंत खराबे यांनी त्यांना कसेबसे शांत करून लोकेश मिस्त्रीलाल फुलारिया यांच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँकेत नोकरीचे स्वप्न : साडेसात लाख हडपले
इन्कम टॅक्समध्ये तसेच रिझर्व्ह बँकेत असिस्टंट आॅफिसर म्हणून नोकरी लावून देण्याची थाप मारून दोन आरोपींनी नागपुरातील बेरोजगारांची लाखो रुपये घेऊन फसवणूक केली.
विभा उदान खांडेकर (वय ३३) यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ९२२४२५०३२४ क्रमांकाचा मोबाईल धारक अरविंद सोनटक्के (सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा, नेहरूनगर कुर्ला, मुंबई) आणि प्रशांत गणपत बडेकर (वय ५०, रा. विंटरवेली दत्तवाडी कुलगाव, बदलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी स्वत:ला उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांच्या जवळचे असल्याची बतावणी करून प्राप्तिकर खाते तसेच रिझर्व्ह बँकेत सहायक अधिकारी म्हणून चांगल्या बेरोजगारांना तातडीने नोकरी लावून देण्याची थाप मारली. त्याला बळी पडून जरीपटका हद्दीत लघुवेतन कॉलनी, एनआयटी गार्डन जवळ राहणाऱ्या विभा उदान खांडेकर (वय ३३) तसेच मन्शा सूर्यभान तायवाडे आणि या दोघींच्या संपर्कातील अनेकांकडून लाखो रुपये घेतले. त्यातील ७ लाख, ३५ हजारांचे आॅनलाईन बँक ट्रॅन्झॅक्शन आरोपींच्या फसवणुकीचा पुरावा ठरले आहे. रक्कम उकळल्यानंतर आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केल्याने त्यांनी फसवणूक केल्याचे पीडितांच्या लक्षात आले. त्यावरून विभा खांडेकर यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली असता सोनटक्के नामक व्यक्ती भलताच असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी अशाच प्रकारे ठिकठिकाणच्या बेरोजगारांना गंडा घातला असावा, असाही संशय आहे.