अकोला तालुक्यात ७६ मि.मी. पाऊस
By admin | Published: June 23, 2016 10:41 PM2016-06-23T22:41:53+5:302016-06-23T22:41:53+5:30
विदर्भात सर्वाधिक पावसाची अकोल्यात नोंद; २७ जून रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता
अकोला: राज्यात मॉन्सून दाखल झाला असून, या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसले तरी मागील २४ तासांत विदर्भात अनेक तालुक्यांसह ३७ ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक ७६ मि.मी. पावसाची नोंद अकोला तालुक्यात करण्यात आली आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा कायम असून, पुढील तीन ते चार दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेश व पश्चिम मध्य प्रदेशचा उर्वरित भाग, हरियाणा,चंदीगढ-दिल्ली व पंजाबचा बहुतांश भाग आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हा पाऊस दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. मागील २४ तासांत २३ जून सकाळी ८.३0 पर्यंत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी जोरदार व तुरळक स्वरू पाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, अकोला तालुक्यात ८ सें.मी. म्हणजेच ७६ मि.मी. (३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद विदर्भात सर्वाधिक आहे. त्यानंतर नागपूर येथे ७ सें.मी., शेगाव ५ से.मी., चिमूर, देवळी, घाटंजी व तेल्हारा व वर्धा येथे प्रत्येकी ४ सें.मी. पाऊस झाला. बाभूळगाव, बाश्रीटाकळी, चिखली, कारंजा, लोणार, मूर्तिजापूर, रामटेक, समुद्रपूर व सेलू येथे प्रत्येकी ३ सें.मी., बुलडाणा, दर्यापूर, धामणगाव, हिंगणा, कळंब, कळंबेश्वर, खामगाव, नांदुरा, पातूर, वाशिम येथे प्रत्येकी २ सें.मी., अंजनगाव, बाळापूर, ब्रम्हपुरी, चांदूर, मालेगाव, पांढरकवडा, रिसोड, सावनेर व वरुड येथे प्रत्येकी १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, येत्या २३ ते २७ जून या काळात कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी,तर मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.