विना फिटनेस धावत आहेत ७६२ स्कूल बसेस, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By सुमेध वाघमार | Published: July 7, 2023 05:58 PM2023-07-07T17:58:50+5:302023-07-07T17:59:51+5:30
स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक : सोमवारपासून आरटीओ व पोलिसांची संयुक्त तपासणी मोहिम
सुमेध वाघमारे
नागपूर : शहर व ग्रामीण भागातील ३,७५७ स्कूल बस व व्हॅनमधील २,९९५ वाहनांनी फिटनेस सर्टीफिकेट म्हणजे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण के ले आहे. उर्वरीत ७६२ वाहने अद्यापही विना ‘फिटनेस’ रस्त्यावर धावत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अशा वाहनावर कारवाई करण्यासाठी सोमवारपासून आरटीओ व पोलीस विभागाची संयुक्त मोहिम राबविण्याचा सूचना शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्या.
पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) चेतना तिडकेयांच्यासह पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकारी, तिन्ही आरटीओ कार्यालयातील अधिकारी व विविध शाळेतील मुख्यध्यापक उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीचा आढावा घेतला.
- आता सुटीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण
ज्या स्कूल व्हॅन किंवा स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याकरिता ऑनलाईन तारीख व वेळ मिळत नसेल अशा वाहनांसाठी आता शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
- क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविल्यास कारवाई
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चे १०६ च्या तरतुदीनुसार दिलेल्या आसन क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांची न केल्यास, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्यास ऑटोरिक्षा, स्कुल व्हॅन, स्कुल बसवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस करीता विनियम) २०११ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.
- पालकांनीही वाहनांचे कागदपत्र तपासावे
ज्या स्कूल बस किंवा स्कूल वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होते, अशा वाहनांचे कागदपत्र वैध असल्याची खात्री पालकांनी करावी, अशा सूचाही देण्यात आल्या.
- योग्यता प्रमाणपत्र वैध करुन घ्या
१० जुलैपासून परिवहन विभाग व पोलसी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व सर्व कागदपत्र वैध करून घ्या, अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गंत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.