ग्रामीण भागातील ७६.३ टक्के शालेय विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:55+5:302021-09-09T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑनलाईन शिक्षणाकरिता स्मार्टफोन, इंटरनेट व वीज या तीन सुविधा आवश्यक आहेत. परंतु, ॲन्युअल स्टेटस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन शिक्षणाकरिता स्मार्टफोन, इंटरनेट व वीज या तीन सुविधा आवश्यक आहेत. परंतु, ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर-२०२०) अनुसार ग्रामीण भागातील केवळ ७६.३ टक्के विद्यार्थ्यांकडेच स्मार्टफोन आहेत. त्यामुळे उर्वरित हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बुधवारी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही माहिती सादर केली. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या ७४.९ तर, खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या ७८.८ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. २०१८मध्ये ही संख्या अनुक्रमे ३६.७ व ४९.३ टक्के होती. गेल्यावर्षी यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आले, पण हजारो विद्यार्थ्यांकडे आजही स्मार्टफोन नाहीत. याशिवाय २०२०मध्ये ७८.१ टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही, तर ५८.६ टक्के विद्यार्थ्यांकडे मोटरसायकल आढळून आली. या दोन वस्तूंच्या अभावामुळेदेखील हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होत आहे.
------------------
घरी पुस्तके असणारे विद्यार्थी
इयत्ता - टक्केवारी
पहिली ते दुसरी - ७९ टक्के
तिसरी ते पाचवी - ८८.२ टक्के
सहावी ते आठवी - ८६.२ टक्के
नववी व त्यावर - ६३.२ टक्के
-----------------
असे उपलब्ध केले जाते शैक्षणिक साहित्य
माध्यम - टक्केवारी
व्हाॅट्सॲप - ९१.४ टक्के
फोन कॉल - ९.१ टक्के
वैयक्तिकरित्या - ११.३ टक्के
इतर पद्धतीने - ७.७ टक्के