नागपूर जिल्ह्यात दीड लाखावर अर्जदारांना ७६९ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:39 AM2018-02-22T00:39:55+5:302018-02-22T00:42:59+5:30
जिल्ह्यात शिशु योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ८४७ लाभार्थ्यांना ३६७ कोटी ८२ लाख रुपये, किशोर योजनेअंतर्गत ९ हजार २६१ लाभार्थ्यांना २०८ कोटी ९७ लाख रुपये, तरुण योजनेअंतर्गत २ हजार ४५८ लाभार्थ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपयांचे असे एकूण ७६९ कोटींचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात शिशु योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ८४७ लाभार्थ्यांना ३६७ कोटी ८२ लाख रुपये, किशोर योजनेअंतर्गत ९ हजार २६१ लाभार्थ्यांना २०८ कोटी ९७ लाख रुपये, तरुण योजनेअंतर्गत २ हजार ४५८ लाभार्थ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपयांचे असे एकूण ७६९ कोटींचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. कर्ज वाटपामध्ये नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यादृष्टीने कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. स्वयंरोजगारासाठी युवकांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज बँकेच्या प्रतिनिधींना दिल्यात. स्वयंरोजगारासाठी हक्काचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात सर्व बँकांनी छोट्या व्यावसायिकांना सुलभपणे कर्ज पुरवठा करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
प्रधानमंत्री मुद्रा बँक कर्ज पुरवठा योजनेमध्ये इंडलँड बँक, एचडीएफसी, रत्नाकर बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी चांगले काम केले असून इतर वाणिज्य बँकांनी अत्यंत अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अशा बँकांनी यापुढे मुद्रा योजनेमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक गरजूंना कर्ज पुरवठा करावा अशा सूचना यावेळी दिल्यात. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.