१.२० कोटींच्या घरफोडीतील ७७ लाखांची रक्कम जप्त; आरोपीच्या वडिलांना घेतले ताब्यात
By योगेश पांडे | Published: May 24, 2023 05:37 PM2023-05-24T17:37:32+5:302023-05-24T17:38:04+5:30
Nagpur News मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १.२० कोटींच्या घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणांतील चोरी गेलेली ७७ लाखांची रक्कम परत मिळाली आहे. घरफोडीचा मुख्य आरोपी प्रेयसीसह अजूनही फरार आहे.
योगेश पांडे
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १.२० कोटींच्या घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणांतील चोरी गेलेली ७७ लाखांची रक्कम परत मिळाली आहे. घरफोडीचा मुख्य आरोपी प्रेयसीसह अजूनही फरार आहे. मात्र त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. संबंधित चोरट्याने नागपुरातीच २० हून अधिक चोऱ्या केल्याची बाब समोर आली आहे.
मनिषा कपाई (साईबाबा कॉलनी, कोराडी मार्ग) यांच्या आईचे निधन झाल्याने त्या १४ ते १७ मे या कालावधीत अमृतसर येथे गेल्या होत्या. घरी कुणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातील ७० लाख रोख रकमेसह १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नरेशकुमार अंकालु महिलांगे (२४, उदयपूर, खैरागड, छत्तीसगड) हा फुटेजमध्ये दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळावरील हातांच्या ठशांची पडताळणी केली असता ते नरेशचेच असल्याची बाब स्पष्ट झाली. तपास पथकाने त्याचे छत्तीसगडमधील घर शोधून काढले. तेथे पथकाने जाऊन तपासणी केली असता त्याच्या घरात ७७.५० लाखांची रोख रक्कम आढळून आली. तो त्याची प्रेयसी गायत्री उर्फ पिंकी गजभिये (३०, मिनीमाता नगर) हिच्यासह फरार होता. मात्र पोलिसांनी त्याचे वडील अंकालु दुधेराम महिलांगेला (५५) अटक केली. अंकालुच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून नरेशचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे, अंकित अंबेपवार, सुनिल डगवाल, राहुल गवई, अनुप यादव, योगेश महल्ले, प्रवीण भोयर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
२० हून अधिक घरफोड्या व चोरी
आरोपी नरेश हा सराईत गुन्हेगार आहे. अवघ्या २४ वर्षांचे वय असलेल्या नरेशने आतापर्यंत २० हून अधिक घरफोडी व वाहनचोरी केल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक वेळी चोरी करून तो छत्तीसगडमधील घरी मुद्देमाल लपवून ठेवायचा. या घरफोडीतील ४२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल घेऊन त्याने घरातूनदेखील पळ काढला.