स्मशानभूमीजवळचे ७७ टक्के रहिवासी आरोग्याच्या समस्येने ग्रस्त; सीएफएसडीचे सर्वेक्षण

By निशांत वानखेडे | Published: November 22, 2023 03:37 PM2023-11-22T15:37:15+5:302023-11-22T15:40:59+5:30

बहुतेक स्मशानभूमीत लाकडावरच शवदहन, गट्टूची उपलब्धता नगण्य

77 percent of residents near cemeteries suffer from health problems; Survey of CFSD | स्मशानभूमीजवळचे ७७ टक्के रहिवासी आरोग्याच्या समस्येने ग्रस्त; सीएफएसडीचे सर्वेक्षण

स्मशानभूमीजवळचे ७७ टक्के रहिवासी आरोग्याच्या समस्येने ग्रस्त; सीएफएसडीचे सर्वेक्षण

नागपूर : शहरातील १९ स्मशानभूमींच्या जवळपास राहणाऱ्यांपैकी ७७ टक्के रहिवाशांना खोकला, घशाची खसखस, डोळ्याची जळजळ यांसारख्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यातील बहुतेक स्मशानभूमीवर शवदहनासाठी लागडाचाच वापर अधिक होत असून गट्टू व इतर पर्यायांची उपलब्धता नाही व धूर जाण्यासाठी चिमणीची व्यवस्था नाही.

सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी) ने फेब्रुवारी ते मे २०२३ या काळात नागपुरात असलेल्या १९ स्मशानभूमीचे प्रदूषणाच्या दृष्टीने सर्वेक्षण केले. प्रत्येक स्मशानभूमीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यावर होणारे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला. ८१५ लोकांशी संवाद करण्यात आला. यातील ७७ टक्के प्रतिसादकर्त्यांची घरे स्मशानभूमीपासून ५०० मीटर अंतरावर आहेत. या कुटुंबाना वायू प्रदूषणासह आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापैकी ५८ टक्के कुटुंबातील मुलांच्या शाळा स्मशानभूमींच्या जवळ आहेत व ही जवळीक मुलांसाठी सुरक्षित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सर्वेक्षणातील इतर महत्त्वाचे पैलू

  • उत्तरदात्यांपैकी ३९ टक्के ज्येष्ठ नागरिकांसह राहतात, ज्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागते.
  • १९ पैकी ८ स्मशानभूमीत चिमणी आहेत पण त्यातील केवळ ५ मध्ये कार्यरत आहेत व ३ अकार्यक्षम आहेत. ११ स्मशानभूमीत चिमणी नाहीच.
  • शवदहनासाठी लाकूड हेच सर्वाधिक वापरात येणारे इंधन आहे. तब्बल १२ स्मशानभूमीत केवळ लाकडाचाच वापर होतो. इतर कोणतेही पर्यायी इंधन नाही.
  • ११ स्मशानभूमीत लाकूड मोफत उपलब्ध आहेत. इतर ठिकाणी त्याची किंमत २८०० रुपये/टन आहे. एका शवदहनासाठी अंदाजे ३०० किलो लाकूड लागते.
  • १९ पैकी केवळ ६ घाटावर कृषी कचरा ब्रिकेट (गट्टू) चा पर्याय उपलब्ध आहे. एका शवदहनासाठी अंदाजे २५० किलो गट्टू लागते.

 

सुचविलेले उपाय

  • प्रत्येक स्मशानभूमीवर शव दहनासाठी गट्टूचा पर्याय उपलब्ध करण्यात यावा. त्याबद्दल जनजागृती करण्यात यावी. लाकडाऐवजी गट्टूच्या वापरास प्राेत्साहन देण्याची गरज आहे.
  • गट्टूच्या जास्त वापरासाठी, सर्व स्मशानभूमीत जास्त साठवणुकीची गरज आहे.
  • वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी सर्व स्मशानघाटावर चिमणी बसविणे आवश्यक आहे. अकार्यक्षण चिमणी दुरुस्त करण्यात याव्या.
  • स्मशानभूमीत आणि आजूबाजूला अनिवार्य म्हणून निर्धारित केलेल्या ग्रीन बफरचे तातडीने पालन करणे आवश्यक आहे.
  • स्मशानभूमीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण आरोग्य सर्वेक्षण करून उपचारात्मक उपाय विकसित होणे आवश्यक आहे.

Web Title: 77 percent of residents near cemeteries suffer from health problems; Survey of CFSD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.