तीन जलाशयांमध्ये ७७० दलघमी जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:37+5:302021-06-18T04:07:37+5:30
नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : ताेतलाडाेह, पेंच व खिंडसी ही तिन्ही जलाशये एकमेकांना जाेडली असून, यातील पेंच ...
नत्थू घरजाळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : ताेतलाडाेह, पेंच व खिंडसी ही तिन्ही जलाशये एकमेकांना जाेडली असून, यातील पेंच जलाशयातील पाणी रामटेक व माैदा तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना सिंचनासाठी दिले जाते. वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय व्हायची. मात्र, यावर्षी तिन्ही जलाशयांमध्ये सध्या एकूण ७७० दलघमी जलसाठा असल्याने धानाच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
पेंच पाटबंधारे विभाग नागपूरअंतर्गत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील एकूण १ लाख २० हजार हेक्टरमधील पिकांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. यात ७० हजार हेक्टर खरीप व ५० हजार हेक्टरमधील रबी पिकांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा हा मुख्यत: पेंच नदीवरील ताेतलाडाेह जलाशयातून हाेताे. या नदीच्या उगमाकडे मध्य प्रदेशात चाैराई धरण असून, खालच्या भागाला पारशिवनी तालुक्यात पेंच जलाशय आहे. पेंचमधील पाणी सिंचनासाठी वापरले जात असून, त्यासाठी कालव्यांची निर्मिती केली आहे. शिवाय, रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशयात याचे जलाशयातील पाणी साेडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
सध्या पावसाळ्यापूर्वी तोतलाडोह जलाशयात ६२५ दलघमी (६१.५१ टक्के), पेंच जलाशयात १२० दलघमी (८४.९१ टक्के) आणि खिंडसी जलाशयात २५ दलघमी (२५.५० टक्के) असा एकूण ७७० दलघमी पाणीसाठा आहे. पेंचचे लाभक्षेत्र डाव्या व उजव्या या दाेन कालव्यांनी जाेडले आहे. पारशिवनी, रामटेक, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व इतर तालुक्यांना जाेडणाऱ्या डाव्या मुख्य कालव्याची लांबी ३३ किमी तर पारशिवनी, कामठी, माैदा व सावनेर तालुक्यांना जाेडणाऱ्या उजव्या कालव्याची लांबी ४८ किमी आहे.
तोतलाडोह जलाशयाची पाणी साठवण क्षमता १,०१६ दलघमी आहे. चाैराई धरणामुळे या जलाशयातील पाण्याची आवक ४२१ दलघमीने घटली आहे. पाण्याची ही कमतरता दूर करण्यासाठी मध्य प्रदेशातील कन्हान नदीवर जामघाट-लाेहघाेगरी येथून ६५ किमी टनलद्वारे पाणी आणण्याची याेजनाही राज्य शासनाने २०१८ मध्ये आखली हाेती. या प्रकल्पामुळे ३०० दलघमी पाणी मिळणार आहे. या पाण्याचा वापर सिंचनासाेबतच १६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी हाेणार आहे.
...
लाेहघाेगरी प्रकल्प महत्त्वाचा
ताेतलाडाेह जलाशयातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी लाेहघाेगरी प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी ५० हेक्टर वनजमिनीची आवश्यकता आहे. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम थाेडे मंदावले आहे. ताेतलाडाेह व पेंच जलाशय सिंचनासाेबत नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची तसेच खापरखेडा व काेराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पांना लागणाऱ्या पाण्याची गरज भागवते. त्यामुळे हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
...
चाैराईच्या ओव्हरफ्लाेचा फायदा
सन २०१८ मध्ये १५ ऑगस्टपर्यंत रामटेक व पारशिवनी परिसरात पाऊस काेसळला नव्हता. शिवाय, चाैराई धरणातील पाणीही साेडण्यात आले नव्हते. त्यामुळे ताेतलाडाेह व पेंच जलाशयातील पाणीसाठा खूप खालावला हाेता. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने धानाचे लागवड क्षेत्र अर्ध्यावर आले हाेते. नागपूर शहराला पिण्यासाठी पेंचच्या मृत जलसाठ्यातील १०० दलघमी पाणी देण्यात आले हाेते. त्यानंतर सलग दाेन वर्षे चाैराई धरण ओव्हरफ्लाे झाल्यााने पाण्याची कमतरता जाणवली नाही.
.....
या तिन्ही जलाशयांमध्ये यावर्षी पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील धानाच्या पिकाच्या सिंचनासाठी पाणी मिळण्याची १०० टक्के शाश्वती आहे. धानाच्या राेवणीच्यावेळी पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. त्यामुळे राेवणीची कामे रेंगाळणार नाही. शिवाय, मजुरांनाही काम मिळेल.
- राजू भाेमले, उपविभागीय अभियंता,
पेंच पाटबंधारे उपविभाग, रामटेक.
...