नागपुरात ८३९ मद्यपि चालकांची उतरवली झिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:23 PM2018-03-03T23:23:21+5:302018-03-03T23:23:45+5:30
शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. सणासुदीच्या काळात याला आळा घालण्यासाठी दरवर्षी ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते. असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता.
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यात मद्यपि चालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. याला आळा बसावा विशेषत: धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त (वाहतूक) एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनातील या मोहिमेत शहराच्या हद्दीत ८३९ मद्यपि वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक चेंबर २ अंतर्गत १६८ मद्यपिंवर कारवाई
चेंबर-०२ अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) जयेश भांडारकर यांनी १६८ मद्यपि वाहनचालकांविरुद्ध ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई केली. विशेष म्हणजे, दारू पिऊन वाहन चालवू नये यासंदर्भातील आवाहन वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले होते.
रुग्ण, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक धोक्यात
या विशेष मोहिमेत एमएच ३१ डीएस २५६१ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा चालक नीळकंठ तिजारे, रा. दत्तमंदिर गोधनी रेल्वे आणि एमएच ४९ जे ०२५४ या क्रमांकाचा स्कूल व्हॅनचालक नंदकिशोर गोंडाणे, रा. नंदनवन हे दोघेही दारू पिऊन वाहन चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांच्यावरही १८४/१८५ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. रुग्णवाहिका व स्कूल व्हॅन दारू पिऊन चालविली जात असल्याने रुग्ण व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला धक्का बसला आहे.