नागपुरात ७९ डॉक्टरांची कोरोनावर मात; ६२ डॉक्टर उपचाराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:09 PM2020-09-19T12:09:11+5:302020-09-19T12:10:08+5:30
आतापर्यंत मेडिकलच्या १४१ निवासी व इन्टर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७९ डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात के ली आहे. हे डॉक्टर पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहेत तर ६२ डॉक्टर अजूनही उपचाराखाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत खऱ्या अर्थाने निवासी डॉक्टर लढवय्यांसारखे काम करीत आहेत. अहोरात्र सेवा करत घरापासून लांब राहत कर्तव्य बजावत आहे. निवासी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून इन्टर्न डॉक्टरही कोरोना कक्षात राबत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या सतत संपर्कात येत असल्याने आतापर्यंत मेडिकलच्या १४१ निवासी व इन्टर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७९ डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात के ली आहे. हे डॉक्टर पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहेत तर ६२ डॉक्टर अजूनही उपचाराखाली आहेत.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून रोज १५०० ते २००० रुग्णांची नोंद होत आहे. खासगी रुग्णालयांतील सेवा सामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अशा रुग्णांसाठी मेयो, मेडिकल आशेचे केंद्र ठरले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी संपादन करणारे निवासी डॉक्टर तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून एक वर्ष रुग्णसेवा देणारे इन्टर्न डॉक्टर हे विभागप्रमुखांसह वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांना सेवा देत आहेत. मेडिकलमध्ये ५५० निवासी तर २०० इन्टर्न डॉक्टर इमानेइतबारे डॉक्टर सैनिकांची भूमिका बजावत आहे. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. तरुण प्रसाद यांनी ‘लोकमत’ला सांगितले, एका निवासी डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागते. वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांचा वॉर्ड निवासी डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाला आहे. तरी निवासी डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत आहेत. जे निवासी डॉक्टर कोरोनाची बाधा होऊन बरे झाले ते पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आहेत.
मे महिन्यापासून प्रोत्साहनपर भत्त्याची प्रतीक्षा
निवासी डॉक्टर फ्रंटलाईनवर काम करत आहेत. डॉक्टरांना शारीरिक ताणासह मानसिक ताणाशी दोन हात करावे लागत आहेत. परंतु शासनाला याचा विसर पडल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, कोरोना कक्षात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन म्हणून मे महिन्यापासून दरमाह १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता सप्टेंबर संपायला आला असताना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. शासनाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकात गेल्या चार महिन्यांचा प्रोत्साहनपर भत्ता ऑगस्ट महिन्याच्या विद्यावेतनात दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु १० तारखेपर्यंत होणारे विद्यावेतन १८ सप्टेंबरची तारीख उजाडूनही मिळालेले नाही.
डॉ. तरुण प्रसाद
अध्यक्ष, मार्ड मेडिकल