Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 03:37 PM2019-12-19T15:37:13+5:302019-12-19T15:39:50+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल
नागपूर - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबतच राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लावतो, असे म्हणत भाजपा नेत्यांवर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्याच्या 7/12 वर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघंय, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना मुद्दा लावून धरला. मी सरकारला पाठिंबा दिला असेल, पण आपण शेतकऱ्यांसोबत बेईमानी करत आहोत. मीसुद्धा बेईमानीच करतोय. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का? 7 वा वेतन आयोग आपण फटकीनं देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही.
पीएम किसान योजना अद्यापही 25 टक्के लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्काराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच अधिकाऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची 5 लाखांची शेती गहाण ठेऊन केवळ 20 हजारांचं कर्ज दिलं जातंय. आता, ठाकरे सरकार आहे. शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही. अतिवृष्ट झाली, पाण्याखाली शेती गेली पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाला नाही. पिकविम्याच पैसै शेतकऱ्यांना तातडीने भेटणं गरजेचं आहे. केवळ 7 मंत्र्यांचं जरी सरकार असलं तरी, पिकविम्याचे पैसे 15 दिवसांत शेतकऱ्याला कसे भेटतील, हे प्रयत्न नक्की करू. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची गरज होती. उद्धव ठाकरे हे शिवभक्त आहेत, ते हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत नक्कीच देतील हा मला आत्मविश्वास आहे, असे म्हणत शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय.
आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनीही राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले. शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.