प्रवाशांना खाऊपिऊ घालत रेल्वेने घातले ८.१३ कोटी खिशात
By नरेश डोंगरे | Published: March 2, 2024 08:24 PM2024-03-02T20:24:26+5:302024-03-02T20:24:51+5:30
मध्य रेल्वेची सरबराई : ११ महिन्यातच कॅटरिंग कमाईचे टार्गेट पूर्ण
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रवाशांना विविध अन्नपदार्थ खाऊ घालत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आतापर्यंत ८.१३ कोटी रुपये आपल्या तिजोरीत टाकले. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या आर्थिक वर्षाचे कॅटरिंगचे टार्गेट पूर्ण होण्याच्या अवधीसाठी एक महिना शिल्लक आहे. मात्र, ११ महिन्यातच लक्ष्य पूर्ण करण्याची किमया नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी साधली आहे.
गेले आर्थिक वर्ष संपताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २०२३-२४ चे कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य ७.५० कोटी रुपये निर्धारित केले होते. ते पूर्ण करण्यासाठी रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर दिल्या जाणाऱ्या कॅटरिंच्या कंत्राटावर आणि कंत्राटदारांकडून दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. खानपानाचा दर्जा सुधारण्यासोबतच विविध रेल्वेस्थानक तसेच गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर्सचा असणारा धुमाकुळही थांबविला. विभागातील प्रमूख रेल्वे स्थानकांवर अचानक तपासणीची मोहिम राबवून अनधिकृत खाद्य पदार्थ, पाणी, ज्यूससह अन्य चिजवस्तू विकणारांवर कारवाईचा सपाटा लावला होता. खाद्यपदार्थ विकणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांना स्वच्छता आणि दर्जा राखण्यासाठीही वारंवार सूचना, आदेश दिले जात होते. त्याचेच चांगले परिणाम समोर आले असून, निर्धारित केलेले उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या एक महिन्यापूर्वीच कॅटरिंग उत्पन्नाचे लक्ष्य नागपूर विभागाने साधले. मार्च २०२४ पर्यंत ७ कोटी, ५० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना २९ फेब्रुवारीपर्यंत विभागाने ८ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळवले.
टार्गेट पेक्षा १८ टक्के जास्त
नागपूर विभागाने मिळवलेले हे उत्पन्न सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या निर्धारित केलेल्या टार्गेटपेक्षा १८ टक्के जास्त आहे. या यशाचे श्रेय कॅटरिंग विभागाचे नियोजन करणाऱ्या आणि वेळोवेळी त्या संबंधाने आवश्यक कारवाई करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाते, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी नोंदविली आहे. खानपानाचा दर्जा उंचावल्यामुळेच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.