मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 02:29 PM2022-05-11T14:29:00+5:302022-05-11T14:34:28+5:30

पोलिसांनी चौकशीनंतर एकूण १९ जणांविरोधात फसवणुकीसह सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

8 crore scam in Madhuban Credit Co-operative Society; Crimes filed against 19 | मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमुदत पूर्ण झाल्यावरदेखील ठेवीदारांना रकमेचा परतावा नाही

नागपूर : सतरंजीपुरा येथील मधुबन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ८ कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १९ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुदत पूर्ण झाल्यावरदेखील ठेवीदारांना रकमेचा परतावा मिळाला नव्हता.

वडधामना निवासी तेजराम गोउत्रे यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. १९९८ पासून २०२२ या कालावधीत त्यांच्यासह विविध ठेवीदारांनी सोसायटीत पैसे गुंतविले होते. सोसायटीचे अध्यक्ष, संचालक व एजंटांनी विविध कालावधीत अनेकांना कर्ज वाटप केले. मात्र, बऱ्याच रकमेची कर्जवसुली झाली नाही व त्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला नाही. तक्रारकर्त्यांसह अनेक ठेवीदारांच्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतरदेखील त्यांना रकमेचा परतावा करण्यात आला नाही. वारंवार विचारणा करूनदेखील समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. ठेवीदारांची एकूण ८ कोटी २० लाख ९६ हजार ७६६ रुपयांची रक्कम अडकली होती. अखेर तक्रारकर्त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीनंतर एकूण १९ जणांविरोधात फसवणुकीसह सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मनोहर राऊळकर, अनिल येवले, मुरलीधर राऊत, अशोक पोपळी, अनिल घिमे, सदानंद हेडाऊ, मुकेश नटिए, सुरेश बरडे, संजय फुलबांदे, कमलाबाई येवले, नरेंद्र राऊत, रमेश टिवटे, संजय वानखेडे, कपिल कुट्टिटे, बबनराव कडू, पराग येवले, कलावती राऊत, रेखा टिवटे, प्रमोद कोतेजवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: 8 crore scam in Madhuban Credit Co-operative Society; Crimes filed against 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.