वैदर्भीय भूमीने दिले राज्याला अष्टमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 03:15 PM2019-12-30T15:15:24+5:302019-12-30T15:16:24+5:30
राज्याच्या मंत्रिमंडळात सात कॅबिनेट मंत्री असल्याने विदर्भाचे पारडे जड झाले आहे. या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या नव्या राज्यमंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या भूमीतील आठ मंत्री असून त्यात सात कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सात कॅबिनेट मंत्री असल्याने विदर्भाचे पारडे जड झाले आहे. या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
यात नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, काँग्रेसचे सुनिल केदार, अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व प्रहारचे बच्चू कडू, बुलडाण्यातून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे, चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले असून अन्य सर्वांना कॅबिनेटचा दर्जा मिळाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच पहिल्या शपथविधीमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला होता तर काँग्रेसचे नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळाले आहे. या दोन्ही पदांचा समावेश केला तर विदर्भाला सन्मानाची नऊ पदे मिळाली आहेत.
असे असले तरी गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांना मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात भोपळा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नसले तरी नाना पटोले यांच्या रुपाने मिळालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर त्याला समाधान मानावे लागले आहे.