८ महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या प्रजापती दाम्पत्याचे भंडाऱ्यातही रॅकेट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 11:04 AM2022-11-14T11:04:24+5:302022-11-14T11:10:15+5:30
नागपुरात अगोदरही होते वास्तव्य; सर्व आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू
नागपूर : आठ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणारे प्रजापती दाम्पत्य व सूत्रधार श्वेता खान पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता कसून चौकशीला सुरुवात झाली आहे. प्रजापती दाम्पत्याने भंडारा जिल्ह्यातही वास्तव्य केले होते व त्या कालावधीत तेथेही त्यांनी मुले पळविली असल्याची पोलिसांना शंका आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.
गुरुवारी डिप्टी सिग्नल परिसरातून राजकुमारी राजू निषाद यांच्या ८ महिन्यांच्या चिमुकल्याचे गुरुवारी अपहरण करण्यात आले होते. शेजारी राहणाऱ्या योगेंद्र आणि रिता प्रजापती यांनी हे अपहरण केले होते व पोलिसांनी पाच तासांतच बाळाचा शोध लावला होता. या प्रकरणात पोलिसांनी फरजाना उर्फ असार कुरेशी (४०, कुंदनलाल गुप्तानगर), सीमा परवीन अब्दुल रौफ असारी (३८, विनोबा भावेनगर), ऑटोचालक बादल मडके (३५, पाचपावली), सचिन रमेश पाटील (४५, जरीपटका) या आरोपींना अटक केली होती, तर शनिवारी सीमा खान व प्रजापती दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. १९ नोेव्हेंबरपर्यंत त्यांना कोठडी मिळाली आहे.
रविवारी तिघांचीही चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीतच योगेंद्र प्रजापतीने दीड वर्षात दोनदा नागपुरात आल्याची कबुली दिली आहे. येथे दोन महिने राहून ते भंडाऱ्याला परत गेले होते. नागपुरात येण्याअगोदर भंडारा, आमडी येथे राहत असल्याची माहिती समोर आली. फरजानाच्या सांगण्यावरून मुलाचे अपहरण केल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, फरजानासोबतच्या ओळखीच्या प्रश्नावर तो समाधानकारक उत्तर देत नाही. फरजानाही उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तिने श्वेता खानकडे अंगुलीनिर्देश करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रजापती दाम्पत्य जेथे वास्तव्याला होते, तेथील मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची ‘लिंक’ही शोधण्यात येणार आहे.
श्वेता खानला एक लाख मिळाले
श्वेता खान उर्फ श्वेता रामचंद्र साळवे हिला मुलाची खरेदी करणाऱ्या दाम्पत्याकडून मिळालेल्या अडीच लाख रुपयांपैकी एक लाख रुपये मिळाले. प्रजापती दाम्पत्याला ६० हजार, सीमा परवीनला ५५ हजार आणि फरजाला १० हजार रुपये मिळाल्याचा दावा चौकशीत योगेंद्र प्रजापतीने केला आहे.
प्रजापतीची तीन मुले कुठे?
प्रजापती दाम्पत्याला पाच मुले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त चार आणि दहा वर्षांचा मुलगा होता. इतर तीन मुले कुठे असल्याचा प्रश्न पडला असून, पोलिसांनी त्यांना इतर तीन मुलांनाही बोलावण्यास सांगितले आहे.