८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:36 AM2020-08-13T10:36:23+5:302020-08-13T10:38:06+5:30
नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
गणेश हुड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, आजच्या स्पर्धेच्या युगात गरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
आमची प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. बालवाडी चालवण्याची जबाबदारी नाही. अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. मनपाचा हा निर्णय तुघलकी व आत्मघातकी ठरणार आहे. बालवाडी व केजी-१ व केजी -२ चे वर्ग बंद केल्यास गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
२०१८-१९ च्या तुलनेत २०१९- २० या वर्षात मनपा शाळांची पटसंख्या १२२०ने घटली. तर बालवाडीतील पटसंख्या ५२२ ने वाढली आहे. मनपा शाळातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ९,३३६ असून ९ वी ते १२ वी या वर्गात ३ हजार विद्यार्थी आहेत.
बालवाडी, केजी-१ व केजी -२ मधून पुढे हेच विद्यार्थी मनपा शाळेत प्रवेश घेतात. यातून पटसंख्या वाढीला मदत होते. असे असतानाही हे वर्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मनपाच्या अगणवाडीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
८० शिक्षक अतिरिक्त ठरतील
मनपा शाळांतील पटसंख्या वाढावी म्हणून अगणवाडी, केजी- १ व केजी - २ वर्ग सुरू करून यासाठी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला होता. असे ८० वर्ग बंद केल्यास तितकेच शिक्षक अतिरिक्त असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढेल.
अंगणवाडी बंद केल्यास शाळाही बंद होतील
मनपा शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. पटसंख्या वाढीसाठी अंगणवाडी व केजी -१ व केजी- २ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनपा प्रशासनाने पुढील सत्रासाठी शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात असे वर्ग बंद केल्यास भविष्यात मनपाच्या शाळा बंद पडतील. शिक्षक अतिरिक्त ठरतील. गरीब विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येईल.
- राजेश गवरे, अध्यक्ष, शिक्षक संघटना मनपा.