"कंगनाचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:05 PM2022-12-30T18:05:58+5:302022-12-30T18:06:57+5:30
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
नागपूर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. उद्योजकांकडे टक्केवारी मागितली, असा घणाघात शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या घरावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने वकिलाला तब्बल 80 लाख रुपये दिले होते, असा आरोप एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केला आहे. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. बाळासाहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा मी तुमच्या पाठिशी आहे, पण हे तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेत होते. पण, कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले असा, आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. महाविकास आघाडी विरोधात बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला गेला असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2020 मध्ये कंगना राणौत हिच्या मुंबईतील पाली हिल्स येथील घरावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. ते घर तिचे ऑफिसदेखील होते. ती तिथूनच आपली कामे पाहत असे. मात्र कंगना राणौतच्या या घराचा काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने तिच्या घराच्या काही भागावर बुलडोजर चालवला होता. आपल्याला या प्रकरणाची कोणतीही कल्पना नसल्याचे तसेच हे बांधकाम अधिकृत असल्याचे कंगना राणौतने म्हटले होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून तिच्या घरावर कारवाई केली होती. यानंतर कंगना राणौत देखील आफल्या घरावर कारवाई केल्याप्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सोशल मीडियाद्वारे धारेवर धरले होते.
एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंवर घणाघात
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये आपल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला", अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लोबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवले. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे ते म्हणाले.