मध्य प्रदेशच्या सीमेवर ८० लाख पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:54 PM2019-03-15T21:54:37+5:302019-03-15T21:56:25+5:30

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया करीत शुक्रवारी ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

80 lakhs caught on the border of Madhya Pradesh | मध्य प्रदेशच्या सीमेवर ८० लाख पकडले

मध्य प्रदेशच्या सीमेवर ८० लाख पकडले

Next
ठळक मुद्देनिवडणूक पथकाची कारवाई : दोन कार पकडल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया करीत शुक्रवारी ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमले आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी ३० व ५० लाख अशी ८० लाखांची रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. गुरुवारी देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ७ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले होते, हे विशेष.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर निवडणूक विभागाच्या पथकाला होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.४९ बी.बी. ०८०१ मध्ये ३० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. या पथकातील कृषी अधिकारी रमेश राठोड, ग्रामसेवक भूषण सोमकुवर व गौरव ठाकरे आणि पथकातील सहकाऱ्यांनी मध्य प्रदेशच्या सौसर येथून येणाऱ्या निळ्या रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत पांढऱ्या गुलाबी रंगाची नॉयलॉनची पशु आहाराची बॅग दिसून आली. या बॅगमध्ये ५०० रुपयांच्या २ हजार नोटा असे १० लाख रुपये, शंभर रुपयांच्या १ हजार ८०० नोटा असे १८ लाख व २० रुपयांच्या ५ हजार नोटा असे १ लाख आणि दहा रुपयांच्या दहा हजार नोटा असे एक लाख अशी एकूण ३० लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करून पथकाने गाडी पलाश माहेश्वरी यांच्या ताब्यात दिली.
सदरची रक्कम राजेंद्र जितमल सावला रा.सौंसर यांच्याकडून जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक तासानंतर सौंसरकडून एम.एच.३१ ए.जी.६९६१ पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार पथकाला दिसून आली. या कारची तपासणी केली असता डिक्कीत ५० लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही कार कैलाश सुदा रा.बेरडी, मध्यप्रदेश चालवित होता. त्याने ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौंसर शाखेतून काढून कनक कॉटन इंडस्ट्री खैरी पंजाब ता.सावनेर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रक्कम पांढऱ्या नायलॉन बॅगमध्ये ठेवली होती. यासोबतच नोटावर स्टेट बँक, सौंसरचे सील होते. पथकाने याबाबतची माहिती तहसील कार्यालयाला कळविली. यानंतर तहसीलदार दीपक करांडे, नायब तहसीलदार सतीश मसाळ, केळवद ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक द्वारकानाथ गोंदके घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा केली. तहसील कार्यालयाने या घटनेची माहिती आयकर विभागाला दिली. माहिती मिळतात सहायक आयकर आयुक्त अरविंद रेंदे व त्यांचे सहकारी सावनेर तहसील कार्यालयात दाखल झाले. पुढील चौकशी सुरु आहे.
पुरावा सोबत ठेवा
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी विचारणा केली असता १० लाखांहून अधिक रक्कम नेणाऱ्यांनी सर्व कागदपत्र सोबत ठेवावे आणि पथकाला सहकार्य करावे.

Web Title: 80 lakhs caught on the border of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.