८० टक्के शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; १२०० कोटी रुपयांचे संरक्षण
By गणेश हुड | Published: August 8, 2023 02:54 PM2023-08-08T14:54:06+5:302023-08-08T14:59:18+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला
नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केवळ एका रुपयात पीक विमा दिला जात आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यामध्ये २७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यावर्षी २ लाख ३३ हजार शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के झाली आहे. या शेतकऱ्यांना १ हजार २५५ कोटींचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत होती. आधी ती ३० जूलै पर्यंत होती. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षांसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ही योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या हंगामासाठी तीन वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे.
८५०० कोटींची पीक कर्ज वाटप
नागपूर जिल्ह्याला १४०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे. ७ ऑगस्टपर्यत ८५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. अशी माहिती विपीन इटनकर यांनी दिली.