जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण: देवेंद्र फडणवीस, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 06:27 AM2024-03-10T06:27:12+5:302024-03-10T06:27:24+5:30
८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महायुतीची दिल्लीमधील बैठक सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील, अशी परिस्थिती नाही. ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी, असे आमचे मत होते. आज हिंदुत्वाची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणुकीत काय करायचे या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय होऊ शकतात.
त्यांना आमच्या शुभेच्छा
ॲड. प्रकाश आंबेडकर हे कुणाबद्दल काय बोलतात, यावर मी काय बोलणार? त्यांना आमच्या शुभेच्छा, असे म्हणत फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट पैसे : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. फसवणूक टाळण्यासाठी त्यांच्या खात्यात सरळ पैसे जमा होतील, असे ते म्हणाले.