अनेक लॅबचे ८० टक्के कर्मचारी पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:55+5:302021-04-25T04:07:55+5:30
मेहा शर्मा नागपूर : काेराेनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षिततेचा विचार करणारे नागरिक दुसऱ्या लाटेत मात्र सहज आणि निष्काळजीपणा करीत असल्याचे ...
मेहा शर्मा
नागपूर : काेराेनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षिततेचा विचार करणारे नागरिक दुसऱ्या लाटेत मात्र सहज आणि निष्काळजीपणा करीत असल्याचे चित्र आहे. सामान्य माणसांनी मास्क फेकून दिला त्याप्रमाणे नमुने तपासणाऱ्या प्रयाेगशाळेत काम करणाऱ्या तंत्रज्ञही पीपीई किट वापरण्याचे टाळताना दिसत आहेत. यामुळे त्यांना स्वत:ला व नमुने घेत असलेल्या रुग्णांनाही धाेका निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदारपणामुळे शहरातील प्रयाेगशाळांचे ८० टक्के कर्मचारी संक्रमित हाेत असल्याचे समजते. ‘लाेकमत’ने याबाबत शहरातील प्रयाेगशाळांचा आढावा घेतला.
स्वराज लॅबच्या डाॅ. स्वाती यांनी सांगितले, प्रयाेगशाळेचे कर्मचारी जणू स्वत:ला काेराेनापासून मुक्त असल्याचे समजतात की काय, असे वाटते. आम्ही त्यांना नमुने तपासताना पीपीई किट घालण्याच्या सूचना देताे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आमच्याकडे २५ कर्मचारी कार्यरत आहेत व त्यातील ८० टक्के संक्रमित आढळून आले आहेत. कदाचित लसीकरण झाल्यामुळेही त्यांच्यात अहंगंड निर्माण झाल्याचे दिसते. पहिल्या लाटेच्या वेळी आम्ही सुरक्षितता पाळत हाेताे, पण दुसऱ्या लाटेत निष्काळजीपणा हाेत आहे, हे खरे आहे. सध्याच्या भीषण परिस्थितीत सर्व मनुष्यबळ कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र, आमच्याही कुटुंबात असलेले संक्रमण, वाहतुकीची समस्या आदी कारणांमुळे टेस्टची मागणी पूर्ण करण्यास आम्हाला संघर्ष करावा लागताे आहे. संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत असल्याने अशावेळी पीपीई किट नियमाचे पालन कठाेरपणे अंमल करणे गरजेचे असल्याचे डाॅ. स्वाती यांनी व्यक्त केले.
सुविश्वास डायग्नाेस्टिक लॅबच्या डाॅ. संध्या सावजी म्हणाल्या, प्रयाेगशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे आणि नमुने तपासणीचे काम करीत असल्याने विषाणूबाबत त्यांना सवय झाली असल्याचे वाटते. मात्र, जरी त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल, पण ते वाहक आहेत, ही गाेष्ट त्यांनी विसरू नये. आता आमच्याकडचा एक कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळला, तर दुसऱ्या दाेघांच्या कुटुंबात संसर्ग झाला आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे आमच्या कामाला मर्यादा घालाव्या लागतात.
शहरात काही लॅब आहेत, ज्यामध्ये नियमांचे कठाेरपणे पालन केले जाते व तसे न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाते. स्पेशालिटी लॅबचे डाॅ. वेदांत राठी म्हणाले, आम्ही नमुने तपासणाऱ्या तंत्रज्ञांना पीपीई किटचा पुरवठा करताे आणि सध्या तर किटचे दरही कमी झाले आहेत. प्राेटाेकाॅलनुसार आम्ही नियमांचे पालन करण्याकडे जातीने लक्ष देत आहाेत. यापूर्वी निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरूनही काढले हाेते. तक्रार आली की, कारवाई निश्चित आहे. कर्मचाऱ्यांची नियमित अँटिजेन चाचणी करीत असल्याचे सांगत संक्रमित आढळल्यास त्वरित गृहविलगीकरणात पाठविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ध्रुव लॅबच्या डाॅ. माधवी देशमुख म्हणाल्या, प्रयाेगशाळेतील कर्मचाऱ्यांना पीपीई किट वापरण्याशिवाय पर्यायच नाही. लॅब तंत्रज्ञाने किट परिधान केली नसेल, तर त्वरित तक्रार करण्याचे आवाहन रुग्णांना केले आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आम्ही रुग्णांना सेंटरवरच बाेलावताे, पण गंभीर रुग्ण किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, तर घरी जाऊन तपासणी करीत असल्याचे डाॅ. माधवी यांनी स्पष्ट केले.