८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:36 AM2023-11-04T06:36:38+5:302023-11-04T06:37:25+5:30
गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश
राजेश शेगाेकार
नागपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा एक भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजच्या पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरीत विसर्ग करावा लागला. या प्रकल्पाची नॅशनल डॅम सेफ्टी ॲथाॅरटी (NDSA)च्या पथकाने पाहणी करून अहवाल दिला.
गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश
धरणासंदर्भात नियोजन, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण तसेच ऑपरेशन आणि देखभाल करण्यात सरकारला अपयश आले आहे, अशा शब्दांत अहवालात फटकारण्यात आले. झालेले नुकसान पाहता आगामी काळात मेडिगड्डा धरणच पुन्हा बांधावे लागणार आहे, असा निष्कर्ष काढला आहे.
सहा खांबांना गेले तडे
मेडिगड्डा बॅरेजच्या सहा खांबांना तडे गेल्यानंतर एनडीएसएच्या सहा सदस्यीय तज्ज्ञांनी बॅरेजला २३ आणि २४ ऑक्टोबरला भेट दिली तसेच तेलंगणाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाहणीनंतर पथकाने ४३ पानांचा अहवाल दिला आहे.
अहवालात म्हटले की,...
nबॅरेजचे १५ ते २१ दरम्यानचे खांब १६ हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या प्रवाहाचा सामना करण्यास सक्षम ठरले नाहीत.
nखांब बुडाल्याने फ्लोटिंग स्ट्रक्चर म्हणून केलेले डिझाइन, प्रकल्पाचे नियाेजन आणि अंमलबजावणीमधील उणिवा उघड करतात.
nबॅरेजच्या कमकुवतपणामुळे सर्व ८५ दरवाजे उघडण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे राखीव दहा दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले.
तपासणी, देखभाल नाही
२०१९-२० मध्ये बॅरेज सुरू झाल्यापासून सिमेंट-काँक्रीट ब्लॉक्सची किंवा लॉन्चिंग ऍप्रन्सची तपासणी किंवा देखभाल केली नाही. यामुळे बॅरेज हळूहळू कमकुवत होत आहे. बॅरेजची पूर्णपणे दुरुस्ती होईपर्यंत ते निरुपयोगी आहे.
खराब झालेला सातव्या क्रमांकाचा खांब नव्याने बांधणे आवश्यक आहे. तसे करताना इतर खांब काेसळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती म्हणजे धरणाची पुनर्बांधणी करणेच ठरणार असल्याचे अहवालात म्हटले.
२ मे २०१६
पायाभरणी
८०,०००
कोटी खर्च
१६.१७
टीएमसी क्षमता
८५
दरवाजे
७,५०,०००
हेक्टर नवीन
सिंचन क्षमता