नागपूर जिल्ह्यातील कोराडीत ८० टनाच्या जहाजाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:40 AM2018-06-14T10:40:00+5:302018-06-14T10:40:12+5:30
विदर्भात जहाज निर्मिती म्हटल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. कोराडीमध्ये तब्बल ८० टन वजनाच्या जहाज निर्मितीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
दिनकर ठवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भात जहाज निर्मिती म्हटल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. कोराडीमध्ये तब्बल ८० टन वजनाच्या जहाज निर्मितीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या जून महिन्याच्या अखेरपर्यंत एका ‘पोकलेन’ला घेऊन हे जहाज कोराडी येथील १९२ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या तलावाची साफसफाई करताना दिसणार आहे. हा अनुभव संस्मरणीय असणार आहे. कारण अशा पद्धतीचे काम केवळ समुद्र किनाऱ्याने होत असल्याचे ऐकीवात आहे. परंतु विदर्भवासीयांना असा अनुभव पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. या माध्यमाने ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या कोराडी पर्यटनाला वेग मिळणार आहे.
कोराडी येथील या संग्रहण तलावाच्या सीमांकन व खोलीकरणाचे ५० कोटी खर्चाचे काम सुरू आहे. याअंतर्गत तलावातील ‘टाईफा’ नावाचे गवत, इतर कचरा व खोलीकरणाच्या कामाचा समावेश आहे. गवत व कचरा काढण्याचे आव्हानात्मक काम किनारपट्टीत काम करणाऱ्या दांडगा अनुभव असणाऱ्या कोस्टल ड्रेजिंग अॅण्ड आर बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. मुंबई या कंपनीला देण्यात आले आहे.
तलावातील गवत पोकलेनच्या माध्यमातून काढावयाचे आहे. त्यासाठी पोकलेन वाहून नेणारे ८० टन वजनाचे जहाज कोराडीला ‘भवन्स’ शाळेसमोर तलावाच्या आत तयार करण्याचे काम सुरू आहे.
या जहाजाला ‘राठोड-१’ असे नाव देण्यात आले असून, याच्या मदतीला काढलेले गवत व कचरा किनाऱ्यावर आणण्यासाठी ‘राठोड-२’ नावाचे लहान जहाज तयार करण्यात येणार आहे. सध्या हा तलाव बहुतांश गवताने व्यापला आहे. तलावाची खोली अधिक आहे. तलावातील गवत काढल्यानंतर आतील गाळ काढण्याचे काम केले जाईल. त्यासाठी विकास मरिन सर्व्हिसेसकडून खास ‘कटर सक्शन ड्रेजर’ आणण्यात येणार आहे. या मशीनच्या साह्याने ३ ते ५ मीटर खोलीवरील गाळ काढून तो ५०० मीटर लांब अंतरावर फेकल्या जाणार आहे. हे पंटून सिप कमी वेळात तयार व्हावे तसेच पालकमंत्री बावनकुळे यांच्या नियोजनानुसार काम व्हावे, यासाठी कंपनीच्यावतीने महेद्र शिंदे, रतनसिंग राठोड व नूर मोहम्मद विशेष प्रयत्न करीत आहेत.
तलावाच्या किनारी सीमांकनावर पाळ (भिंत) टाकण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. तलावातील गाळ काढणे, गवत काढणे हे आव्हानात्मक काम आहे. सध्या गवताने व्यापलेला कुरणासारखा दिसणारा तलाव पाण्याच्या संग्रहणाने व्यापलेला विदर्भातील सर्वात मोठा तलाव म्हणून दृष्टीस पडेल.
२२ तज्ज्ञांची चमू दाखल
या जहाजाला कोस्टल परिभाषेत स्पड पंटून व्हेसल अथवा पंटून सिप असे म्हटले जाते. या जहाजाच्या निर्मितीसाठी २२ तज्ज्ञांची चमू खास मुंबईवरून कोराडीत दाखल झाली आहे. त्यांना समुद्रात अशा पद्धतीने काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या पंटून सिपचे डिझाईन प्रसिद्ध नेव्हल आर्किटेक्टकडून तयार करण्यात आले असून, यावर पोकलेन ठेवून तलावातील कचरा व गवत साफ केले जाणार आहे.
जहाजाच्या रंगरंगोटीला आठवडाभरात सुरुवात
दीड कोटीचे हे पंटून सिप या महिन्याच्या शेवटी अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तलावात प्रवेश करणार आहे. तयार झालेल्या या जहाजाला पोकलेनसह तलावात प्रविष्ट करण्यासाठी व्हेंसल लाँचिंग टीमला पाचारण करण्यात येणार आहे. जहाजाच्या रंगरंगोटीला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. या जहाजाला चार नांगर राहणार असून, त्याआधारे ते तलावात पाहिजे त्याठिकाणी स्थिरावेल व पोकलेनला आपले काम करता येईल. एकूणच हा सर्व अनुभव पाहणाऱ्यांना डोळ्यात साठवून ठेवावा असाच असणार आहे. या सर्व कार्यावर मुख्य अभियंता (बांधकाम) अनंत देवतारे यांची चमू देखरेख ठेवत आहे.