नागपुरात कॅरेज अँड वॅगनच्या ८० कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:11 PM2019-04-05T22:11:29+5:302019-04-05T22:14:01+5:30
कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक देण्याचे मान्य केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक देण्याचे मान्य केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नागपूर रेल्वेस्थानकावर कॅरेंज अँड वॅगन विभागात पीयूष ट्रेडर्सला रेल्वेगाड्यांच्या सफाईचे काम देण्यात आले आहे. हे काम करणाऱ्या कामगारांनी अनेकदा नियमानुसार वेतन देण्याची मागणी केली. परंतु कंत्राटदाराने सातत्याने कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कामगारांच्या वेतनातून मागील दीड वर्षांपासून पीएफचे पैसे कापण्यात येत आहेत. परंतु केवळ दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याचे खात्यात दिसत आहे. याशिवाय कामगारांना साप्ताहिक सुटी देण्याची मागणीही कंत्राटदाराने पूर्ण केली नाही. त्यासाठी कामगारांनी १ एप्रिलला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना नोटीस देऊन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी जवळपास ८० कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सकाळपासून कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. कामगारांनी काम बंद केल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकडून रेल्वेगाड्या सफाईचे काम करून घेतले. सायंकाळी संबंधित कंत्राटदाराने १०० रुपये अधिक वेतन देण्याचे जाहीर केल्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब घरडे यांनी केले. यावेळी अस्मिता साखरे, चेतना घोडेस्वार, रत्नमाला चनोडे, गीता कोकासे, निता सहारे, चंद्रकला फटिंग, उषा चहांदे, मंदा चवरे, प्रतिमा चवरे, निर्मला सातपुते, संगीता पेलने, अनिता डहाके, छाया प्रजापती, राजू बावनकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.